मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत; राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत; राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक

पणजी : मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व इतर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा होत आहे. सोमवारी सकाळी त्यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन शाश्वत विकासावर चर्चा केली. दुसरीकडे, संघटनात्मक बाबींविषयीच्या बैठकीसाठी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे सुद्धा दिल्लीत उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे दोघेही एकाच वेळी दिल्लीत असल्याने, राज्यातील रिक्त मंत्रिपद भरण्याबाबत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी महत्त्वाची चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


Image


या संदर्भात माहिती देताना प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि संघटनात्मक बाबींवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासोबत आमची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे देखील उपस्थित राहतील. मुख्यमंत्री इतर काही शासकीय कामांसाठी दिल्लीत आले असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. मनोज परब यांनी आरजी (RG) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्येही नेतृत्व बदल करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून अमित पाटकर यांना हटवून गिरीश चोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात नोकरभरती तसेच रिक्त मंत्रिपदाबाबत सत्ताधारी आमदारांमध्ये काहीसे असंतोषाचे वातावरण असतानाच, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीची संख्या वाढली आहे. मागच्या आठवड्यात प्रदेश भाजप अध्यक्ष आणि मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. यानंतर गेल्या बुधवारी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधानांसह अन्य केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी आज पुन्हा दिल्लीत त्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आहे.


हेही वाचा