ईपीएफओ ३.० चाचणी यशस्वी; आता यूपीआयने पीएफ काढल्यास रक्कम त्वरीत खात्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
ईपीएफओ ३.० चाचणी यशस्वी; आता यूपीआयने पीएफ काढल्यास रक्कम त्वरीत खात्यात

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच आपल्या सदस्यांसाठी मोठी सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ईपीएफओ ३.० (EPFO 3.0) अंतर्गत सदस्यांना आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (UPI)  माध्यमातून थेट पीएफची रक्कम काढता येणार आहे. केंद्र सरकारने या सुविधेची चाचणी पूर्ण केली असून; लवकरच ती देशभर लागू होणार आहे.

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, यूपीआय (UPI) आधारित ईपीएफ (EPF) पैसे काढण्याच्या सुविधेची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या खात्यात उपलब्ध असलेली रक्कम पाहता येईल. तसेच यूपीआयद्वारे ती थेट बँक खात्यात हस्तांतरित करता येईल.

या व्यवहारासाठी सदस्यांना त्यांच्या यूपीआय पीनचा (UPI PIN) वापर करून प्रमाणीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे निधी हस्तांतरण अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.

त्वरित मिळणार निधी

यूपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर सदस्यांना आवश्यकतेच्या वेळी तत्काळ निधी उपलब्ध होईल. बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर ती डिजिटल व्यवहारांसाठी वापरता येईल. तसेच डेबिट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून रोख रक्कमही काढता येईल.

सध्या कशी आहे प्रक्रिया?

सध्या ईपीएफची रक्कम काढण्यासाठी सदस्यांना दावा (Claim) सादर करावा लागतो. मात्र ऑटो-सेटलमेंट प्रणालीमुळे पात्र दावे तीन दिवसांच्या आत मंजूर केले जातात. २०२५ मध्ये आजारपण, शिक्षण, विवाह किंवा घर बांधणीसाठीच्या आगाऊ दाव्यांची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती.

पूर्ण आणि अंशतः पैसे काढण्याचे नियम

सध्याच्या नियमांनुसार वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा घराशी संबंधित गरजांसाठी सदस्यांना अंशतः ईपीएफ रक्कम काढता येते. तर वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास संपूर्ण निधी काढण्याची परवानगी आहे. अंतिम पैसे काढण्यापूर्वी खात्यात किमान २५ टक्के शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

दरम्यान, ईपीएफओ ३.० मुळे पीएफ निधी काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि डिजिटल होणार असल्याने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा