तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई सोडणार पक्ष..!

आज राजीनामा देण्याची शक्यता : नवा पक्ष स्थापन करणार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई सोडणार पक्ष..!

चेन्नई : तामिळनाडूचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP) आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्षाचा ठळक चेहरा असलेले के. अण्णामलाई (K Annamalai) हे भाजपचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ते दिल्लीत पक्षाचे प्रमुख नितीन नबीन (Nitin Nabin) यांना हा निर्णय औपचारिकपणे कळवण्याची शक्यता आहे, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. ते लवकरच आपला नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करणार आहेत.

अण्णामलाई यांनी आपला निर्णय आधीच पक्का केला आहे. दिल्लीचा हा दौरा केवळ एका राजकीय बैठकीपुरता मर्यादित नसून आपल्या सार्वजनिक जीवनातील गेल्या सहा वर्षांचा काळ ज्या पक्षासोबत व्यतीत केला, त्या पक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही तो एक भाग आहे. ‘आयपीएस सेवेचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने मला ज्या संधी, अनुभव आणि राजकीय प्रवास दिला, त्याबद्दल ते पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानू इच्छितात,’ असे एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले.

जोसेफ विजयच्या एंट्रीने बदलली समीकरणे

अलीकडेच अभिनेता-राजकारणी सी. जोसेफ विजय (C. Vijay Joseph) यांच्या निवडणुकीतील विजयाने राज्याचे राजकीय समीकरणच बदलून टाकले. गेले अनेक आठवडे अण्णामलाई यांच्या राजकीय भवितव्याबाबतच्या चर्चा सुरू होती. अण्णामलाई यांनी मात्र अशा चर्चांना पूर्णविराम देणे टाळले. गेल्या सुमारे पाच वर्षांच्या काळात अण्णामलाई यांना तामिळनाडूत भाजपचे भावी नेते म्हणून सादर केले जात होते. त्यांनी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आणि तुलनेने तरुण वयात राजकारणात प्रवेश केला. लवकरच पक्षाचा सर्वात प्रमुख चेहरा म्हणून ते उदयास आले. 

तिकीट कापल्याची होती चर्चा...

अलीकडेच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून अण्णामलाई यांनी स्वत:हून माघार घेतली​ होती. प्रचारकार्यात अधिक वेळ देता यावा, यासाठी​ आपण तिकीट स्वीकारले नसल्याचे ते म्हणाले होते. मात्र आता ते पक्षाला रामराम करण्याची शक्यता असल्याने निवडणुकीनंतर पक्षाचा त्याग करण्यासाठीच त्यांनी उमेदवारी स्वीकारली नसल्याची​ चर्चा आहे.

हेही वाचा