राज्यातील मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक

दोन वर्षांत ११ टक्क्यांपर्यंत वाढ : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- ६ (एनएफएचएस) अहवालातून स्पष्ट

Story: पिनाक कल्लोळी |
3 hours ago
राज्यातील मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक

गोवन वार्ता
पणजी : राज्यात मागील काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारात वाढ होत आहे. गोव्यात मधुमेह (डायबेटीस), उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन), लठ्ठपणा (ओबेसिटी) रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण- ६ (एनएफएचएस) अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, गोव्यातील या तीनही आजारांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. एनएफएचएस -५ नुसार राज्यात १५ वर्षांवरील पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण २४.१ टक्के, उच्च रक्तदाबाचे प्रमाण २६.८ टक्के तर लठ्ठपणाचे प्रमाण ३२.६ टक्के होते. एनएफएचएस -६ मध्ये हे प्रमाण वाढून अनुक्रमे ३२.१ टक्के, २७.५ टक्के आणि ४३.६ टक्के झाले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने २०१९-२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधारे एनएफएचएस -५ जारी केला होता. २०२३- २४ दरम्यान गोळा केलेल्या माहितीच्या आधारे एनएफएचएस - ६ हा अहवाल नुकताच जारी केला आहे. वरील दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील १५ वर्षांवरील महिलांमधील रक्तदाबाच्या प्रमाणात किंचित घट झाली आहे. एनएफएचएस -५ नुसार राज्यात मध्यम अथवा अत्यंत उच्च रक्तदाब असणाऱ्या महिलांचे प्रमाण २७.५ टक्के होते. एनएफएचएस -६ मध्ये हे प्रमाण कमी होऊन २६.२ टक्के झाले आहे. यादरम्यान महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण २०.८ टक्क्यांवरुन २७.५ टक्के झाले आहे. लठ्ठपणाचे प्रमाण ३६.१ टक्क्यांवरून ४५.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
एनएफएचएस -६ नुसार राज्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण १४० एमजी/डीएलपेक्षा अधिक असण्याचे प्रमाण २७.७ टक्के आहे. शहरी भागात हेच प्रमाण २७.४ टक्के आहे. शहरी भागातील पुरुषांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण १४० किंवा त्याहून अधिक असण्याचे प्रमाण ३६.३ टक्के, तर ग्रामीण भागात २७.४ टक्के आहे. शहरी भागात उच्च रक्तदाब असणाऱ्या पुरुषांचे प्रमाण २६.३ टक्के, तर ग्रामीण भागात २९ टक्के आहे.
ग्रामीण महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक
एनएफएचएस -६ नुसार राज्यातील शहरी भागातील महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७.८ टक्के, तर शहरी भागातील महिलांमध्ये २४.९ टक्के आहे.
शहरी भागात लठ्ठपणा अधिक
अहवालानुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागातील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ४४.१ टक्के, तर ग्रामीण भागात ४२.९ टक्के आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ४१.१ टक्के, तर शहरी भागात ४८.३ टक्के आहे.