‘वन टीम, वन व्हिजन’नुसार काँग्रेसची वाटचाल सुरूच राहणार

नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घेतली पहिली बैठक


2 hours ago
‘वन टीम, वन व्हिजन’नुसार काँग्रेसची वाटचाल सुरूच राहणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ‘वन टीम, वन व्हिजन : बेटर गोवा इन २०२७’ या संकल्पनेवर काँग्रेसची वाटचाल सुरूच राहणार आहे, असे नूतन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर चोडणकर यांनी पहिली बैठक घेतली. आगामी निवडणुकीत २१ आमदार निवडून आणण्याच्या उद्दिष्टाने काम करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
या बैठकीला उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष शशांक नार्वेकर, दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष असिझ नोरोन्हा, कुशावती काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वेरेकर, तसेच म्हादई जिल्हा समितीचे अध्यक्ष मंगलदास नाईक उपस्थित होते. पक्षबांधणीसाठीची कार्ययोजना आणि रोडमॅप यावर बैठकीत चर्चा झाली.
गिरीश चोडणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीनंतर मनीषा उसगावकर आणि शर्मिला सिद्दिकी यांनी राजीनामे दिले असले तरी काही जणांचा नाराजीचा सूर आता मावळल्याचे दिसत आहे. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय मान्य करावाच लागतो, असे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही पक्षासाठी आपले काम पुढे सुरूच राहील, असे स्पष्ट केले.
जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी अनेक नेत्यांनी बंगळुरूमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यावेळी निवडणुकांनंतर प्रदेशाध्यक्षपदी अन्य नेत्याची निवड होण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार आता आदेश जारी करण्यात आला आहे. हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असून दोन दिवसांत गोव्यात येऊन विरियातो फर्नांडिस, अमित पाटकर आणि इतर नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. निर्णय जाहीर करण्यापूर्वी खासदार विरियातो फर्नांडिस यांना स्वतंत्रपणे माहिती देण्यात आली नव्हती, मात्र पक्षातील अनेकांना या बदलाची कल्पना आधीपासूनच होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाराजांची समजूत काढणार : माणिकराव ठाकरे
डिसेंबरमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच गोवा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता. राज्यातील काही प्रमुख नेत्यांना याची कल्पना होती. बंगळुरूमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात चर्चा झाली होती. आता अमित पाटकर, विरियातो फर्नांडिस आणि इतर नेत्यांशी चर्चा केली जाईल. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.