जखमी युवक अद्याप बेशुद्धावस्थेत; संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

अन्य एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
जखमी युवक अद्याप बेशुद्धावस्थेत; संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

पणजी : ‍ताळगाव येथील साहील कुट्टीकर याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत संशयित हेमंत शिरोडकर आणि एकनाथ गावस यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. तसेच संशयित रज्जाक करजगी याचा अटकपूर्व जामीन अर्जही नामंजूर करण्यात आला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी हा आदेश दिला. न्यायालयाने नमूद केले की, पीडित साहील कुट्टीकर याच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू असून तो बेशुद्ध अवस्थेत आहे.१२ मे रोजी रात्री ताळगाव येथील महालक्ष्मी मंदिराजवळ पूर्ववैमनस्यातून साहील कुट्टीकर याच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हेमंत शिरोडकर, एकनाथ गावस, राजू आणि वाम्नेश कुट्टीकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी हेमंत शिरोडकर (चिंबल) आणि एकनाथ गावस (ताळगाव) या दोघांना अटक केली आहे. तर राजू आणि वाम्नेश कुट्टीकर हे दोघे फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, संशयित वाम्नेश कुट्टीकर याने मेरशी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने फेटाळून लावला. याच दरम्यान अटक केलेल्या दोघा संशयितांना न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या दोघांना न्यायालयीन कोठडी ठोठावली.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य
सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता दर्शन गावस यांनी पीडिताची प्रकृती गंभीर असून तो अजूनही बेशुद्ध असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयितांना जामीन देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज तसेच रज्जाक करजगीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा