रेंट अ कार, रेंट अ बाईकचे २२७ अपघात; बेशिस्त वाहनचालकांमुळे गोव्यात अपघातांचा कहर; नियमभंगावर कठोर कारवाईची मागणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मद्यपान करून वाहन चालवणे आणि ‘रेंट अ कॅब’ किंवा ‘रेंट अ बाईक’ चालवताना होणारी बेशिस्त यामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. पाच वर्षांतील आकडेवारीनुसार, राज्यात २२७ अपघात झाले असून त्यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारने ‘रेंट अ कॅब’ आणि ‘बाईक’ची सुविधा सुरू केली; मात्र, आता ती त्रासदायक ठरत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. वाहन भाड्याने देण्यापूर्वी मालकांनी पर्यटकांना रस्ते आणि वाहतूक नियमांची माहिती द्यावी. ‘मद्यपान करून वाहन चालवणार नाही,’ असे हमीपत्र पर्यटकांकडून घेणे अनिवार्य करावे. अपघात घडल्यास चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ‘रेंट अ बाईक’चे ५८ आणि ‘रेंट अ कॅब’चे १६९, असे एकूण २२७ अपघात झाले. ‘रेंट अ बाईक’मुळे ८ आणि ‘रेंट अ कॅब’मुळे १४ जणांना प्राण गमवावे लागले. मृत्यू, गंभीर किंवा किरकोळ दुखापत आणि वाहनांचे मोठे नुकसान झाल्यासच गुन्हे नोंदवले जातात. मात्र, अनेकदा पर्यटक खटले टाळण्यासाठी तडजोड करून प्रकरणे मिटवतात. त्यामुळे अनेक अपघातांची नोंदच होत नाही.

गोव्यात ‘कुछ भी चलता है’ होऊ नये : रोहन खंवटे
‘रेंट अ कार’ व्यवसायात चाललेला गलथानपणा रोखणे गरजेचे. गोव्यात ‘कुछ भी चलता है’ अशी परिस्थिती होऊ नये. बेभानपणे ‘रेंट अ कार’ चालवणाऱ्यांमुळे गोव्यातील लोकांचा जीव जातो. यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी सरकारने नवीन कायदा अमलात आणावा, त्यानंतरच ‘रेंट अ कॅब’ आणि ‘रेंट अ बाइक’सारखे अपघात कमी होतील.
- मायकल लोबो, आमदार, कळंगुट

