तस्करीतून ५.५० कोटींचे मनी लाँड्रिंग : आरोपपत्रात ४३ जणांची साक्ष नोंद

पणजी : पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील केटामाईन तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मेरशी येथील विशेष न्यायालयात (पीएमएलए) ९,७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार राहुल शेडगे (५६, कुर्ला) आणि अँथनी पॉल यांच्यासह १२ जणांविरोधात ५.५० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला असून, आरोपपत्रात ४३ साक्षीदारांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे.
केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई व गोवा पथकाने ११ जून २०१८ रोजी पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील विजय इंडस्ट्रीजवर छापा टाकून ५३ किलो केटामाईन जप्त केले होते. याशिवाय केटामाईन निर्मितीसाठी वापरला जाणारा मोठ्या प्रमाणातील रासायनिक कच्चा मालही जप्त करण्यात आला होता. त्याचवेळी पर्रा-हडफडे येथील एका घरावर टाकलेल्या छाप्यात ७.५ किलो हशिष, ६०० ग्रॅम केटामाईन आणि १.५ किलो अफू जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी भारतीयांसह काही परदेशी नागरिकांविरोधातही गुन्हे नोंदविण्यात आले होते.
ईडीने २७ जानेवारी २०२० रोजी मनी लाँड्रिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान राहुल शेडगे, अँथनी पॉल, बिंदू करुकट्टीकरन, राजेंद्र भोसले, अमरजीत शुक्ला, इशरतखान परमार, देवेश पुरोहित, मयुर सद्रानी, झाकीर कलावंत, देवाराम राजपुरोहित, गुलाम सामदानी, मल्लीसेट्टी चंद्रा तसेच अॅड्रोइट सर्किट लॉजिक्स प्रा. लि. व जे १७ हॉस्पिटलिटी या कंपन्यांच्या माध्यमातून केटामाईन तस्करीशी संबंधित आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, ईडीने हा तपास पूर्ण करून मेरशी येथील विशेष न्यायालयात १२ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
३.७७ कोटींची मालमत्ता जप्त
या तपासाअंतर्गत ईडीने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुमारे ३ कोटी ७७ लाख ९७ हजार रुपयांची मालमत्ता आणि बँक ठेवी तात्पुरत्या जप्त केल्या होत्या. यात पाच फ्लॅट, मालवण येथील दोन हेक्टर जमीन, २८.७१ लाख रुपयांच्या मुदत ठेवी आणि इतर मालमत्तेचा समावेश होता. संबंधित प्राधिकरणाच्या आदेशानुसार १० मार्च २०२५ रोजी ही मालमत्ता कायमस्वरूपी जप्त करण्यात आली आहे.