आजपासून मासेमारी बंदी लागू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सोमवार, १ जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंदी लागू झाल्याने गोमंतकीयांना आता गळाने पकडलेले गोड्या पाण्यातील मासेच मिळणार आहेत. त्यांना सुंगटे, कोंगे, शिणाणे, तिसऱ्या आणि काळुंदर यांसारख्या माशांवरच समाधान मानावे लागणार आहे. बांगडे, तारले, इसवण, पापलेट, दोडयारे, गोबरे, वेल्ली, लेपो, चणक आणि इतर माशांशिवाय बनवलेली कढी आता गोमंतकीयांना खावी लागणार आहे.
माशांच्या प्रजनन काळात त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी दरवर्षी राज्यात १ जूनपासून मासेमारी बंदी लागू केली जाते. यासंदर्भातील आदेश सरकारने यापूर्वीच जारी केले आहेत. ही बंदी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत ट्रॉलरद्वारे मासेमारी करण्यास बंदी असेल. ‘नारळी पौर्णिमा’ या दिवशी समुद्रपूजन करून पुन्हा मासेमारीला सुरुवात केली जाईल.
भात आणि मासळीची कढी हे गोमंतकीयांचे पारंपरिक भोजन आहे. ट्रॉलर मासेमारीवर बंदी असली तरी होड्यांद्वारे केली जाणारी पारंपरिक मासेमारी सुरू राहणार आहे. त्यामुळे काळुंदर, तिसऱ्या, शिणाणे, सुंगटे आणि कोंगे हे मासे खवय्यांसाठी उपलब्ध राहतील.
मासेमारी बंदीच्या काळात विशेष गस्त
बंदीच्या काळात बेकायदा मासेमारी होऊ नये यासाठी मत्स्यव्यवसाय खाते विशेष गस्त घालणार आहे. यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी दिली.