चार दिवसांनंतर पुन्हा मुख्यमंत्री दिल्लीत

प्रदेशाध्यक्षही दिल्लीत : भाजपाध्यक्षांशी संघटनाविषयी चर्चा


3 hours ago
चार दिवसांनंतर पुन्हा मुख्यमंत्री दिल्लीत

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पुष्पगुच्छ देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत. सोमवारी त्यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे देखील दिल्लीत असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासोबत विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक विषयांवर ते चर्चा करत आहेत.
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष हे दोघेही अचानक दिल्लीत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती आणि पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती दामू नाईक यांनी बैठकीपूर्वी दिली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा गेल्या दहा दिवसांतील हा तिसरा दिल्ली दौरा आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा, सर्वानंद सोनोवाल आणि मनसुख मांडवीय यांच्याही भेटी त्यांनी घेतल्या होत्या. गोव्यात परतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी भरती आयोगामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदविल्याने जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर रविवारी रात्री मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला रवाना झाले.
राज्य मंत्रिमंडळातील एक जागा अद्याप रिक्त आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आणखी एका मंत्र्याचा शपथविधी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यानंतर विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याने दिल्लीतील या बैठका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
हरित विकासावर चर्चा
सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. राज्यातील हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि शाश्वत विकास याविषयी त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
जलपुरवठा प्रकल्पांवर भर
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्यासोबत राज्यातील जलपुरवठा प्रकल्प, पाणी वितरण व्यवस्था तसेच जलस्रोत व्यवस्थापन यासंदर्भात चर्चा झाली. शेती आणि बागायती क्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची मदत मिळावी, यावरही विचारविनिमय करण्यात आला. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलस्रोतांचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल, यावरही मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली.      

हेही वाचा