उद्या होणार शपथविधी

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार असलेले डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या १० ते १२ आमदारांची अंतिम यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. बुधवारी दुपारी ४.०५ वाजता लोक भवन येथील ग्लास हाऊसमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
मंत्रिमंडळाच्या रचनेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीपसिंह सुरजेवाला, कार्यवाह मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्रीपदासाठी निवड झालेले डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही बैठक सोमवारी होणार होती; मात्र राहुल गांधी यांच्या दिल्ली आगमनास झालेल्या विलंबामुळे ती मंगळवारी ढकलण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांनी सुचविलेल्या १२ पैकी सुमारे १० आणि शिवकुमार यांनी सुचविलेल्या १५ पैकी १२ नावांची निवड होण्याची शक्यता आहे. उर्वरित मंत्रीपदे १८ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर भरली जाऊ शकतात.
मंत्रिपदासाठी यतिंद्र सिद्धरामय्या, प्रियंक खरगे, डॉ. एच. सी. महादेवप्पा, संतोष लाड आणि झमीर अहमद खान यांची नावे चर्चेत आहेत. नव्या मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असून; जातीय समतोल, प्रादेशीक प्रतिनिधित्व आणि पक्षनिष्ठा यांचाही विचार केला जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले. त्यांनी दिवसभर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याचा विश्वास
मागील सिद्धरामय्या सरकारमधील एकमेव महिला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पुन्हा मंत्रिपद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महिला व बालकल्याण मंत्री म्हणून गेल्या तीन वर्षांतील आपल्या कामगिरीचा अहवाल त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे.
सोमवारी सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, डॉ. एच. सी. महादेवप्पा आणि के. जे. जॉर्ज हे विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले. राजधानीत सध्या काँग्रेस आमदारांची मोठी गर्दी असून; मंत्रिमंडळातील स्थानासाठी इच्छुक नेत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.