सडा येथील ३५०हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा; महिनाभरात मिळणार घरांचा मालकी हक्क

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
सडा येथील ३५०हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा; महिनाभरात मिळणार घरांचा मालकी हक्क

वास्को : अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या सडा येथील जीआरबी (GRB) गृहनिर्माण वसाहतीतील ३५० हून अधिक कुटुंबांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. जीआरबीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई  यांनी या गृहनिर्माण युनिट्सचा मालकी हक्क येत्या एका महिन्याच्या आत रहिवाशांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा आज मंगळवारी केली. 

या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत. आमोणकर यांनी सांगितले की, या प्रश्नाबाबत त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून प्रत्येक घरासाठी आकारण्यात येणारे शुल्क केवळ १,००० रुपये प्रति युनिट इतके निश्चित केले.

गेल्या अनेक वर्षांपासून मालकी हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबांच्या डोक्यावरचे अनिश्चिततेचे सावट दूर होणार आहे. मालकी हक्क मिळाल्यानंतर रहिवाशांना त्यांच्या घरांबाबत कायदेशीर सुरक्षितता मिळणार असून भविष्यातील व्यवहारही सुलभ होणार आहेत.

या घोषणेमुळे सडा परिसरातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा