युतीसह योग्य रणनिती आखून भाजपचा पराभव करणार : गिरीश चोडणकर

तिकिटीसाठी पैसे घेतले असे एकाही उमेदवाराने आजपर्यंत का सांगितले नाही

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
युतीसह योग्य रणनिती आखून भाजपचा पराभव करणार : गिरीश चोडणकर

पणजी : भाजप सरकारला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. जनता भाजपला कंटाळलेली आहे. विरोधी पक्षांची युती वा योग्य रणनिती आखून येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार आणणे हेच माझे ध्येय आहे, असे नवनिर्वाचीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. 

मी अध्यक्ष असताना ३७ जणांना उमेदवारी दिली होती. यापैकी एकानेही अद्याप पैसे दिल्याचे सांगितलेले नाही, असे सांगत त्यांनी तिकीट विकल्याचा आरोप फेटाळून लावला. अमीत पाटकर यांची उचलबांगडी करीत काँग्रेसने गिरीश चोडणकर यांची प्रदेश अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. यांनतर गोवन वार्ताशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 

भाजप सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवहाराला गोमंतकीय जनता कंटाळलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपसह (BJP) इतर पक्षांच्या कारभारातही लक्ष घालतात. २०२२च्या निवडणुकीत आरजीमुळे ७ मतदारसंघांत फटका बसला. भाजपपेक्षा आम्हाला ९ जागा कमी मिळाल्या असल्या तरी मतांचा फरक फक्त २५००चे आहे. तृणमूल व आपमुळेही धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन झाले.

२०१७ नंतर भाजपच्या मतांची टक्केवारी वाढलेली नाही. मतविभाजनामुळे काँग्रेसचा पराभव झाला. यावेळी काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. अनुकूल वातावरणाचा लाभ घेत युतीसह योग्य रणनिती आखली जाईल. २०२७ मध्ये काँग्रेसचे (Congress Party) सरकार आणणे हेच माझे उद्दिष्ट आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले. 

मागच्या विधानसभा निवडणुकीत  तिकिटे विकल्याचा आरोप केला जातो. आता मिकी पाशेको यांनी हा आरोप केलेला आहे. या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागच्या निवडणुकीत ३७ जणांना उमेदवारी माझ्या कार्यकाळात दिल्या गेल्या यापैकी एकानेही पैसे दिल्याचे सांगितलेले नाही. तसेच आता साडेचार वर्षांनंतर मिकी पाशेको यांनी आरोप करण्याचे कारण काय? निवडणुकीवेळी उमेदवाराला खर्च करण्याच्या क्षमतेबद्धल विचारले जाते. सर्वच पक्ष खर्च करण्याबाबत उमेदवाराची तयारी विचारतात. तेव्हा प्रभारी असलेले दिनेश गुंडू राव यांनी ही बाब मिकींना विचारली असेल. यात गैर काहीच नाही. 

सध्या सर्व पंचायतींमध्ये समित्या स्थापन करून पक्षाचे कार्य पुढे नेण्यास माझे प्राधान्य असेल. पक्ष कार्यावर मी भर देणार असल्याने निवडणूक लढविण्याचा सध्या तरी प्राधान्याने विचार नाही. गोवा फॉरवर्डकडे युती असून; सध्या तरी विजय सरदेसाई यांच्याकडे चांगले संबंध असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

हेही वाचा