नागरिकांकडून चौकशीची मागणी

पणजी : पणजीतील काम्पाल लेकव्ह्यू कॉलनी परिसरातील तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही आठवड्यांपूर्वी मळा परिसरातही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले होते.
त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्याने; पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मृत मासळीमुळे (Fish) दुर्गंधी पसरली असून; परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावणे, सांडपाण्याचा प्रवाह तलावात मिसळणे, प्रदूषण वाढणे किंवा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे ही या घटनेमागील संभाव्य कारणे असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागांनी पाण्याचे नमुने तपासून वैज्ञानिक पद्धतीने चौकशी करावी आणि मासे मृत्यूमागील नेमके कारण शोधून काढावे, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तलावांचे नियमित निरीक्षण, स्वच्छता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन (Environment management) प्रभावीपणे राबविण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरातील जलस्रोतांच्या संवर्धनाचा आणि प्रदूषण नियंत्रणाचा (Pollution control) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून; प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.