
पणजी: बोट मालक मंजुनाथ हरिकांत यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आगशी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. सुरुवातीला या प्रकरणाची नोंद अनैसर्गिक मृत्यू (Unnatural Death) म्हणून करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मच्छीमारी बोट व्यवसायाशी संबंधित असलेले मंजुनाथ हरिकांत नेहमी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम स्वतःजवळ बाळगत असत. याच पैशांच्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण, आरोपींची ओळख आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींचा सखोल तपास केला जात आहे. पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे हत्येचे कारण जाहीर केले नसले तरी आर्थिक हेतू हा तपासाचा प्रमुख मुद्दा असल्याचे समजते.
दरम्यान, मंजुनाथ हरिकांत हे नेहमीप्रमाणे ओडिशा येथील काही कामगारांना सोबत घेऊन मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह समुद्रात तरंगताना आढळला होता. सोबत गेलेले बोटीवरील कामगार बेपत्ता असल्याचे दिसून आले होते.
मंजुनाथ यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून नंतर मृतदेह थेट समुद्रात फेकून दिल्याचा व बोट समुद्र किनाऱ्यावर आणून ठेवून नंतर कामगार आपल्या बॅगा घेऊन पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करून आगशी पोलीस पुढील तपास करीत आहेत.