महाराष्ट्र-गुजरातमधील २० ठिकाणी धाडसत्र

मुंबई : आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) मंगळवारी महाराष्ट्र आणि गुजरातमधील २० ठिकाणी एकाच वेळी मोठी छापेमारी मोहीम हाती घेतली. ही कारवाई नुकताच तुर्कस्तानमधून भारतात प्रत्यार्पित करण्यात आलेल्या दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय सलीम इस्माईल डोला आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्डरिंग तपासाचा भाग आहे.
ईडीने मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा २००२ (PMLA) 2002) अंतर्गत मुंबईसह गुजरातमधील सुरत, अंकलेश्वर आणि राजकोट येथे शोधमोहीम सुरू ठेवली आहे. सलीम डोला (Salim Dola) हा दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित असून, तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी साखळी चालवत असल्याचा आरोप आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबईत दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांची खरेदी, गुप्तपणे मेफेड्रोन (एमडी) या कृत्रिम अमली पदार्थाचे उत्पादन, विविध राज्यांमध्ये वाहतूक व वितरण, परदेशात तस्करी तसेच हवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण करणारे एक संघटित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळे उघडकीस आले आहे.
ईडीच्या पथकांनी रसायन पुरवठादार, रासायनिक व्यापारातील मध्यस्थ, ड्रग्ज उत्पादक व वितरक, आर्थिक व्यवहार सांभाळणारे व्यक्ती, लेखापाल, चार्टर्ड अकाउंटंट तसेच हवाला ऑपरेटर यांच्या ठिकाणी झडती घेतली. गुन्ह्यातून मिळालेला पैसा बेनामी मालमत्ता खरेदीसाठी आणि परदेशातील गुंतवणुकीसाठी वापरला गेला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
या कारवाईमुळे देशभरात पसरलेल्या अमली पदार्थ तस्करी आणि मनी लॉन्डरिंगच्या मोठ्या जाळ्याचा आणखी पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.