आता इराण झुकण्यास तयार नाही; युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांत ट्रम्प अडचणीत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
आता इराण झुकण्यास तयार नाही; युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांत ट्रम्प अडचणीत

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संघर्षानंतर ८ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या युद्धविरामामुळे थेट लष्करी कारवाया काही प्रमाणात थांबल्या असल्या, तरी दोन्ही देशांमधील संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध संपवण्याची गरज भासत असताना, इराण मात्र कोणतीही माघार घेण्यास तयार नसल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

युद्धविरामानंतर पाकिस्तान, कतार आणि इतर मध्यस्थ देशांच्या माध्यमातून चर्चा सुरू असल्या, तरी आखाती प्रदेशातील तणाव कायम आहे. अमेरिकेने इराणच्या जवळ शक्तिशाली नौदल आणि हवाई दल तैनात ठेवले असून, तेहरानवर दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, इराणनेही आपले लष्करी दल उच्च सतर्कतेवर ठेवत युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पुनर्बांधणी सुरू केली आहे.

इराणचा अमेरिकेला इशारा 

इराणने अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला आहे की, गरज पडल्यास ते अमेरिकन तळांवर तसेच आखाती देशांतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करू शकतात. त्यामुळे युद्धविराम कायम ठेवणे आणि पुढील चर्चांसाठी सामंजस्य करार (Memorandum of Understanding) तयार करणे हे दोन्ही देशांसमोरील पहिले मोठे आव्हान ठरत आहे.

व्यापक करारासाठी इस्त्रायली लष्करा मोहिमा थांबवणे आवश्यक : इराण 

दरम्यान, इस्रायलने लेबनॉनमधील कारवाया पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अमेरिका-इराण कराराबाबत विशेष उत्सुकता नसल्याचे मानले जाते.  इराणनेही स्पष्ट केले आहे की, कोणत्याही व्यापक करारासाठी इस्रायली लष्करी मोहिमा थांबवणे आवश्यक असेल.

होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणचे निर्बंध कायम 

इराणने अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांनंतर होर्मुझ सामुद्रधुनीवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. जगातील तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गातून सध्या अत्यल्प जहाजे जात आहेत. परिणामी जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, सुमारे २० टक्के पुरवठा घटल्याचे मानले जात आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला फटका 

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने पर्यायी पाईपलाईन मार्गांचा वापर सुरू केला असला, तरी होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. अमेरिकेची आखाती तेलावरील थेट अवलंबित्व कमी झाले असले, तरी जागतिक बाजारातील तेलाच्या किमतींचा परिणाम अमेरिकन ग्राहकांवरही होणार आहे.

ट्रम्प यांच्यासमोर कठीण पेच

युद्धाला अमेरिकेत मोठा विरोध होत असून, संघर्ष पुन्हा वाढल्यास ट्रम्प प्रशासनावरील दबाव आणखी वाढू शकतो. दुसरीकडे, सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराणकडून निर्बंध शिथिल करणे किंवा गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे यांसारख्या सवलतींची मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र अशा सवलतींना ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील कट्टर गटांचा विरोध आहे.

विश्लेषकांच्या मते, इराणचे सत्ताधारी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याची भावना बाळगून आहेत. त्यामुळे केवळ लष्करी दबावाने ते माघार घेतील, अशी शक्यता कमी आहे. परिणामी ट्रम्प यांच्यासमोर युद्धविराम टिकवणे, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणे आणि इराणसोबत व्यवहार्य करार साधणे ही तीन मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.

हेही वाचा