
केपे : विवाह संकेतस्थळावर ऑनलाईन झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेची तब्बल १.४५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना केपे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी केपे पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
केपे पोलिसांनी (Quepem Police) दिलेल्या माहितीनुसार, केपे येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ४ मे रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान संशयित देवा अरुण तसेच इतर अज्ञात व्यक्तींनी संगनमताने त्यांची फसवणूक केली.
संशयिताची तक्रारदाराशी सुरुवातीला शादी.कॉम (Shaadi.com) या विवाह संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मैत्री वाढवत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे खोटे आश्वासन दिले. पुढे आपण परदेशी चलनासह विमानतळावर अडकलो असून; तातडीने आर्थिक मदतीची गरज असल्याचे भासवून संशयिताने तक्रारदाराला विविध बँक खात्यांमध्ये अनेक व्यवहारांद्वारे १,४५,६०० रुपये जमा करण्यास प्रवृत्त केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गावकर करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर (Social media) किंवा ऑनलाइन (Online) विवाह संकेतस्थळांवर झालेल्या ओळखीच्या व्यक्तींवर आंधळा विश्वास न ठेवण्याचे; आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.