गोव्यातील महिलांनो इकडे लक्ष द्या; ग्रामीण भागातील महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक

एनएफएचएस-६ अहवालातून चिंताजनक वास्तव समोर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
03rd June, 12:11 pm
गोव्यातील महिलांनो इकडे लक्ष द्या; ग्रामीण भागातील महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक

पणजी : गोव्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे (हायपरटेन्शन) प्रमाण शहरी भागातील महिलांच्या तुलनेत अधिक असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-६) अहवालातून समोर आली आहे. अहवालानुसार, ग्रामीण भागातील २७.८ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असून, शहरी भागातील महिलांमध्ये हे प्रमाण २४.९ टक्के आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, वाढता ताणतणाव आणि आरोग्य तपासण्यांकडे होणारे दुर्लक्ष ही उच्च रक्तदाबाच्या वाढत्या प्रमाणामागील प्रमुख कारणे आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची मर्यादित उपलब्धता आणि नियमित तपासण्यांचा अभाव यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचे सांगितले जाते.

उच्च रक्तदाबाचे धोके व उपाय

उच्च रक्तदाब हा हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडाच्या आजारांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे महिलांनी नियमित रक्तदाब तपासणी करणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी नमूद केले आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज या आकडेवारीमुळे अधोरेखित झाली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने २०१९-२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे एनएफएचएस-५ जारी केला होता. २०२३-२४ दरम्यान गोळा केलेल्या माहितीच्या आधारे एनएफएचएस-६ अहवाल जारी केला आहे. या अहवालातून वरील आकडेवारी समोर आली आहे.

गोव्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणाचे प्रमाण जास्त  

गोव्यात मधुमेह (डायबेटीस), उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन), लठ्ठपणा (ओबेसिटी) रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६ (एनएफएचएस) अहवालानुसार, गोव्यात तीनही आजारांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.

एनएफएचएस-५ नुसार १५ वर्षांवरील पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण २४.१ टक्के, उच्च रक्तदाबाचे प्रमाण २६.८ टक्के, तर लठ्ठपणाचे प्रमाण ३२.६ टक्के होते. एनएफएचएस-६ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ३२.१ टक्के. २७.५ टक्के आणि ४३.६ टक्के आहे. 

महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण २०.८ टक्क्यांवरून २७.५ टक्के

दोन वर्षांत १५ वर्षांवरील महिलांमधील रक्तदाबाच्या प्रमाणात किंच‌ित घट झाली आहे.  महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण २०.८ टक्क्यांवरून २७.५ टक्के झाले. लठ्ठपणाचे प्रमाण ३६.१ टक्क्यांवरून ४५.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एनएफएचएस-६ नुसार ग्रामीण महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण २७.७ टक्के, तर शहरी भागात हेच प्रमाण २७.४ टक्के आहे. शहरी पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ३६.३ टक्के, तर ग्रामीण भागात २७.४ टक्के आहे. शहरी भागात उच्च रक्तदाब असणाऱ्या पुरुषांचे प्रमाण २६.३ टक्के, तर ग्रामीण भागात २९ टक्के आहे.

हेही वाचा