महाराष्ट्रातील लोक गोव्याच्या सीमेवरील पेट्रोल पंपांवर अवलंबून

मे महिन्यात उत्तर गोव्यात पेट्रोलच्या खपात मोठी वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd June, 11:48 pm
महाराष्ट्रातील लोक गोव्याच्या सीमेवरील पेट्रोल पंपांवर अवलंबून

पणजी : शेजारील राज्य महाराष्ट्रात पेट्रोलचा तुटवडा (petrol shortage in Maharashtra) जाणवत असल्यामुळे, गेल्या काही दिवसांत गोव्याच्या सीमेवर असलेल्या पेट्रोल पंपांवरून (petrol pump on Goa border) महाराष्ट्रातील लोक आपली गरज भागवत होते. याच कारणामुळे मे महिन्यात उत्तर गोव्यात पेट्रोलच्या खपात मोठी वाढ झाली होती. मात्र, पेट्रोलची मागणी वाढली असली तरी पेट्रोलचा पुरवठा सुरळीत सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील सीमेला लागून असलेल्या भागात, जसे की सावंतवाडी, कुडाळ, ओरोस येथे पेट्रोलसाठी चणचण भासत होती. लोक कॅनमध्ये पेट्रोल भरून नेऊ लागल्यामुळे पेट्रोल पंप मालकांनी 'पेट्रोल नाही' असे सांगून पंप बंद ठेवले होते. यामुळे तेथील लोकांचे प्रचंड हाल झाले होते.
त्याशिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून गेल्या दोन-तीन आठवड्यांत मोठ्या संख्येने पर्यटक आपली खासगी वाहने आणि बसेस घेऊन गोव्यात येत होते. शेजारील राज्यांपेक्षा गोव्यात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे सर्वजण गोव्यात आल्यावर आपल्या वाहनांच्या टाक्या फुल करून घेत होते.
पेट्रोलच्या या वाढलेल्या मागणीमुळे उत्तर गोव्यात इंधनाचा खप १४ टक्क्यांनी वाढला आहे, तर दक्षिण गोव्यात तो १९.३६ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवस झाले महाराष्ट्रात इंधनाचा पुरवठा आता सुरळीत सुरू झाला आहे.

गेल्या वर्षी पेट्रोलला जशी मागणी होती, ती आजही कायम आहे. शेजारील राज्यात पेट्रोलचा तुटवडा होता, तेव्हा केवळ गोव्याच्या सीमेच्या आत असलेल्या पेट्रोल पंपांवरूनच या लोकांनी पेट्रोल भरले आहे. काणकोण, पेडणे भागातील पेट्रोल पंपांवर गर्दी थोडी वाढली होती. पण या वाढलेल्या गर्दीमुळे गोव्यातील लोकांना कोणताही त्रास झाला नाही किंवा पेट्रोल पुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
- नरहर ठाकूर, अखिल गोवा पेट्रोल पंप डीलर्स संघटनेचे अध्यक्ष 

हेही वाचा