मंत्रिमंडळात कोणाला स्थान घ्यायचे हा निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा : दामू नाईक

म्हणाले-आगामी निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल ही खात्री.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
12 mins ago
मंत्रिमंडळात कोणाला स्थान घ्यायचे हा निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा : दामू नाईक

मडगाव : राजकारणात अनेकदा तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. काँग्रेस पक्षापेक्षा भाजप सरकार सर्वसामान्यांसाठी खूप चांगले काम करत आहे, याची जनतेला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काही अपवाद वगळता भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकीत काँग्रेसने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. या दाव्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, राज्यातील 'डबल इंजिन' सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक मोठी विकासकामे केली असून केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. याउलट, काँग्रेसच्या काळातील घोटाळे, त्यांच्या पक्षात सध्या सुरू असलेला अंतर्गत वाद आणि त्यांचे अपयश लोकांना चांगलेच ठाऊक आहे. जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही हे सर्व मुद्दे उपस्थित झाले होते, तरीही जनतेने भाजपवर विश्वास दाखवून पक्षाला मोठा विजय मिळवून दिला. भाजपमध्ये जर काही गोष्टींची 10% कमतरता असेल, तर काँग्रेसचा विचार केल्यास हीच टक्केवारी 90% पर्यंत पोहोचते, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळेच 'दगडापेक्षा वीट मऊ' या न्यायाने जनता भाजपला पसंती देत आहे. काही वेळा राजकीय परिस्थितीनुसार तडजोडीचे निर्णय घ्यावे लागतात; माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही त्यांच्या कार्यकाळात राजकीय परिस्थितीनुसार काहींना सोबत घेऊन सरकार पुढे नेले होते. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांच्या जोरावर आगामी निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला.

नाईक यांनी पुढे स्पष्ट केले की, सरकार चालवताना काही कठीण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यादरम्यान काहींची कामे होतात, तर काहींची राहून गेल्याने ते नाराज होतात. परंतु, भाजप ज्या काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, त्या नक्कीच सुधारेल आणि पुढे मार्गक्रमण करेल.

दरम्यान, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा किंवा कोणाला डच्चू द्यायचा, याचा संपूर्ण अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा असतो. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याविषयी जी चर्चा झाली आहे, त्यानुसार मुख्यमंत्री आगामी काळात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील; परंतु अंतिम निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचाच असेल, असेही दामू नाईक यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा