गोव्यातील धरणात एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक : मंत्री सुभाष शिरोडकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16 mins ago
गोव्यातील धरणात एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक : मंत्री सुभाष शिरोडकर

पणजी : गोव्यात पावसाला उशीर झाला असला तरी विविध धरणात किमान एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील एक महिना जरी पाऊस पडला नाही तरी जलस्त्रोत खाते पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेईल. आम्ही गरज असेल तिथे प्रक्रिया न केलेले पिण्याचे पाणी पुरवू शकतो. अंजुणे आणि पंचवाडी धरणात किमान एक महिना तर साळावली मध्ये दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे.

पाण्याबाबत लोकांनी कोणतीही काळजी करण्याचे गरज नसल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अंजुणे धरणात सर्वात कमी म्हणजेच १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पंचवाडी धरणात २३ टक्के तर दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणात २९ टक्के पाणी शिल्लक आहे.

चापोलीमध्ये ४० टक्के, गावणेमध्ये ४४ टक्के तर तिळारी मध्ये ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा आमठाणे धरणात सर्वाधिक ५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याआधी आवश्यकता असल्यास विविध उपाययोजना करून पाणी साठा अधिक काळ वापरता येणे शक्य असल्याचे जलस्त्रोत खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्यात मान्सून दाखल झाल्यावर धरणातील रिक्त पाणीसाठा लवकर भरणार आहे. मान्सून केरळमध्ये साधारणपणे १ जून दरम्यान दाखल होतो.  त्यानंतर अनुकूल वातावरण असल्यास एका आठवड्यात गोव्यात दाखल होतो.

मात्र यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन लांबले आहे. मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यानंतर पोषक वातावरण असल्यास मान्सून गोव्यात येण्यासाठी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा