आईने रोखले सुद्धा नाही, घटनेनंतर प्रियकराला दिली साथ. तपासात उघड झालेल्या गोष्टींमुळे पोलिसही चक्रावले. केरळ मधील घटना.

तिरुवनंतपुरम : नात्यांमधील क्रूरता आणि मानवी मानसिकतेचा भयानक चेहरा उघडा पाडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना केरळच्या तिरुवनंतपुरम येथे घडली. एका दीड वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याचा त्याच्याच आईच्या डोळ्यादेखत अत्यंत क्रूरपणे छळ करून त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला . अर्शिद असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, त्याच्या आईच्या लिव्ह-इन पार्टनरने त्याची अत्यंत निर्घृणपणे मारहाण करून हत्या केली. पोटच्या गोळ्यावर होणारा अमानुष अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहणारी आणि मूकश्रोता बनून राहणारी त्याची २१ वर्षीय आई अखिला हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. हा संपूर्ण गुन्हा केवळ एका रात्रीत घडलेला नसून, गेल्या तीन महिन्यांपासून रचला गेलेला हा एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट होता. पोलिसांनी आता तांत्रिक आणि सखोल तपासाअंती या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे.

या थरारक गुन्ह्याची सुरुवात २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास झाली. दीड वर्षाच्या अर्शिदला अत्यंत गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत पानवूर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने श्री अविट्टम थिरुनल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्या निष्पाप बालकाला मृत घोषित केले. या घटनेनंतर मुख्य आरोपी अश्कर याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची दिशाभूल करण्यासाठी एक बनावट कथा रचली. त्याने सांगितले की, मुलाच्या घशात खाताना अन्न अडकले होते आणि त्यामुळे तो गुदमरून बेशुद्ध पडला. मात्र, बालकाच्या नातेवाईकांना अश्करच्या या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांनी तत्काळ या प्रकरणाविषयी पोलिसांकडे संशय व्यक्त केला आणि तक्रार दाखल केली. नातेवाईकांच्या या सतर्कतेमुळे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
शवविच्छेदन अहवाल म्हणजेच पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच डॉक्टरासह पोलीस प्रशासनही चक्रावून गेले. अश्कर याने रचलेला बनाव पूर्णपणे खोटा असल्याचे सिद्ध झाले. अर्शिदचा मृत्यू हा अन्नामुळे नाही, तर सतत आणि अमानुषपणे झालेल्या मारहाणीमुळे शरीरात झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे झाला होता. तपास अधिकाऱ्यांना बालकाच्या संपूर्ण शरीरावर अंगावर काटा आणणाऱ्या जखमा आढळून आल्या. अर्शिदच्या चिमुरड्या शरीरावर एकूण ५१ गंभीर जखमा होत्या. यामध्ये त्याच्या गुप्तांगावर झालेली खोल जखम आणि त्याच्या पायांवर सिगारेटचे चटके दिल्याचे डाग स्पष्टपणे दिसत होते. हा अहवाल हाती येताच नेदुमंगाड पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत ३० मे रोजी रात्री उशिरा बालकाची आई अखिला आणि तिचा प्रियकर अश्कर या दोघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गुंता सोडवण्यासाठी आरोपींची कसून चौकशी सुरू केली. सोमवारी पोलिसांनी मुख्य आरोपी अश्कर याला गुन्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच त्यांच्या घरात पुरावे गोळा करण्यासाठी आणि घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी आणले होते. या क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन दरम्यान आरोपी अश्कर याने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, जी ऐकून उपस्थित सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अश्कर याने पोलिसांना सांगितले की, त्याने तब्बल तीन महिन्यांपूर्वीच अर्शिदला संपवण्याचा निर्णय घेतला होता आणि गेल्या एक महिन्यापासून तो सतत त्या निष्पाप जीवाला शारीरिक यातना देत होता. जेव्हा पोलिसांनी त्याला या क्रूरतेमागचे कारण विचारले, तेव्हा त्याने अत्यंत निर्लज्जपणे सांगितले की, अखिलासोबतच्या त्याच्या आयुष्यात अर्शिद हा त्याला सर्वात मोठा अडथळा वाटत होता आणि म्हणूनच त्याला कायमचे दूर करायचे होते.

गेल्या काही आठवड्यांमध्ये अश्कर याने अर्शिदचा छळ करण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धतींचा अवलंब केला होता. तो रोज अर्शिदला लाकडाने आणि हाताने बेदम मारहाण करायचा. मारहाण करताना मुलाचा रडण्याचा किंवा ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत जाऊ नये म्हणून तो अर्शिदच्या तोंडात बळजबरीने कापड कोंबायचा. मारहाण आणि छळासाठी वापरलेली लाकडी काठी, तसेच मुलाला चटके देण्यासाठी वापरलेले लायटर आणि इतर वस्तू त्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जवळच असलेल्या एका कालव्यात फेकून दिल्या होत्या, तर उर्वरित काही गोष्टी त्याने जाळून खाक केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली ती लाकडी काठी आणि लायटर शोधून काढले आणि जप्त केले. २९ मे रोजी जेव्हा अर्शिद खूप जोरात रडू लागला, तेव्हा अश्करचा राग अनावर झाला आणि त्याने थेट मुलाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. अर्शिदचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर अश्कर याने अत्यंत चालाखीने संपूर्ण घर स्वच्छ केले, रक्ताचे डाग आणि इतर पुरावे पुसून टाकले आणि त्यानंतरच त्याला घेऊन तो रुग्णालयात गेला.
या तपासातून आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अर्शिदचा खून होण्याच्या सुमारे एक महिना आधी त्याचे दोन्ही हात फॅक्चर झाले होते. जेव्हा आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी याविषयी विचारणा केली, तेव्हा अश्कर याने तो सायकलवरून पडल्याचा खोटा बहाणा केला होता. इतकेच नाही तर आई अखिला हिने तिच्या पोटच्या मुलाचा हात मोडलेला असतानाचा तो फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता. या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वी, म्हणजेच १६ मे रोजी, अखिला आणि अर्शिद एका बस स्थानकावर एका सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरला भेटले होते. त्या इन्फ्लुएंसरच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केल्याबद्दल त्याने या मायलेकांना काही भेटवस्तू दिल्या होत्या. त्याभेटीदरम्यान काढलेल्या फोटोमध्ये अर्शिदच्या दोन्ही हातांवर प्लास्टरचे कास्ट स्पष्टपणे दिसत होते. जेव्हा त्या कंटेंट क्रिएटरने मुलाच्या हाताबाबत विचारले, तेव्हाही अखिलाने तो सायकलवरून पडल्याचे खोटे उत्तर दिले होते. १ जून रोजी पोलिसांनी केलेल्या तपासात तो मोडलेल्या हाताचा प्लास्टर कास्ट त्यांच्या घराच्या आवारात पडलेला आढळून आला, जो अश्कर याने काढून फेकला होता.

पोलिसांनी घेतलेल्या जबाबात आई अखिला हिने मान्य केले की, तिला अश्कर करत असलेल्या या सर्व अमानुष छळाची पूर्ण कल्पना होती. तिने स्वतः अश्करला तिच्या मुलाला काठीने आणि हाताने मारताना अनेकदा पाहिले होते, परंतु तिने आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी किंवा अश्करला रोखण्यासाठी कधीही कोणताही प्रयत्न केला नाही.
दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती केवळ अर्शिदच्या हत्येपुरती मर्यादित राहिलेली नाही. पोलिसांनी जेव्हा अश्करच्या भूतकाळाचा माग काढला, तेव्हा त्याचे त्याची पहिली पत्नी अमिना हिच्यासोबतचे हिंसक संबंध आणि घरगुती अत्याचाराचा इतिहास समोर आला. ३१ मे रोजी अमिनाच्या आईने म्हणजेच शजिला बिवी यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत अश्करच्या क्रूरतेचा पाढा वाचला. त्यांनी सांगितले की, अश्कर त्यांच्या मुलीला बाथरूममध्ये नेऊन बेदम मारहाण करायचा, तिचे डोके वारंवार भिंतीवर आपटायचा. त्याने तिला छताच्या पंख्याला लटकवून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तिच्या तोंडात ऍसिड ओतले होते.

या जीवघेण्या हल्ल्यामुळे अमिना तब्बल १३ महिने बेशुद्ध होती आणि त्यातील दोन महिने ती व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होती. शजिला बिवी यांनी आरोप केला की, त्यांनी पोलिसांत अनेकदा तक्रारी केल्या असूनही पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नव्हती. आता पोलीस प्रशासन अमिनाच्या भावाचा संशयास्पद मृत्यू आणि अश्करशी साखरपुडा झालेल्या दुसऱ्या एका महिलेच्या मृत्यूच्या अनुषंगानेही सखोल तपास करत आहे. या संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमीत, अर्शिदच्या वडिलांनी म्हणजेच एस. अखील यांनी सुमारे दोण वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती, आणि त्या वेळी अखिला तीन महिन्यांची गरोदर होती. या सर्व गुंतागुंतीच्या आणि क्रूर प्रकरणाचा छडा लावून आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस आता कटिबद्ध झाले आहेत.