शिरोड्यातील शाळेचे बांधकाम आठ दिवसांत सुरू करा!

ग्रामस्थांची मागणी : अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
शिरोड्यातील शाळेचे बांधकाम आठ दिवसांत सुरू करा!

फोंडा : तारीवाडा-शिरोडा येथील सरकारी प्राथमिक शाळेची जुनी इमारत जमीनदोस्त करून ६ महिने उलटले, तरी अद्याप नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या पालक व स्थानिकांनी मंगळवारी रात्री एक तातडीची बैठक घेतली. येत्या ८ दिवसांत शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या विद्यालयाच्या इमारतीचे छप्पर गेल्या ३-४ वर्षांपासून धोकादायक बनले होते. या छपराची दुरुस्ती करण्याचे मागणी ग्रामस्थ वारंवार करीत होते. शाळेच्या पाठीमागे जंगल असल्याने माकडांच्या वावरामुळे कौले फुटून पावसाळ्यात वर्गात पाणी गळत होते. त्यातच इमारतीच्या भिंती मातीच्या असल्याने पावसाळ्यात अनेकदा भिंतींमध्ये वीज प्रवाह उतरत होता. या धोकादायक परिस्थितीमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
पालक आणि स्थानिकांच्या सततच्या मागणीची दखल घेऊन शिक्षण खात्याने अखेर डिसेंबरमध्ये ही जुनी इमारत पाडली. त्यानंतर शाळेतील पहिले ते चौथीच्या १० विद्यार्थ्यांचे जवळच असलेल्या एका खासगी घराच्या खोलीत, तर १५ मुलांच्या अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर स्थानिक मंदिराच्या सभागृहात करण्यात आले.

नव्या शैक्षणिक वर्षात अडचणी वाढणार

डिसेंबरमध्ये शाळेची इमारत पाडल्यानंतर कंत्राटदाराने अद्याप बांधकामला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्षात मुलांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा विद्यार्थ्यांची संख्या ६ वर येण्याची शक्यता आहे.

शाळेची जुनी इमारत पाडून ६ महिने झाले, तरी कंत्राटदाराने अजून कामाची सुरुवात केलेली नाही. पावसाळ्यात मुलांना खासगी खोलीत पाठवणे पालकांसाठी चिंतेचे ठरणार आहे. सरकारने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून तात्काळ बांधकाम सुरू करावे.
- विजय शिरोडकर, स्थानिक ग्रामस्थ
परिसरातील अंदाजे ८ शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यापैकी ७ शाळांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, तारीवाडा येथील शाळेचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ६ महिने काम न झाल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
- सुदाम नाईक, स्थानिक ग्रामस्थ

हेही वाचा