आपल्या पक्षासाठी सर्व काही करण्यासाठी नेहमी ढाल बनून उभा राहणारा हा नेता काँग्रेसकडे आहे, हे काँग्रेसचे नशीब. मुख्यमंत्री झाल्यामुळे काँग्रेसला शिवकुमार यांच्या अनुभवाचा, त्यांच्या रणनीतींचा फायदाच होऊ शकेल. त्यामुळेच शिवकुमार यांच्याकडे देशातील राजकीय लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दक्षिणात्य राजकारणावर जसा चित्रपट ताऱ्यांचा प्रभाव आहे, तसाच प्रभाव तिथल्या सिनेसृष्टीवरही राजकारणाचा आहे. या दोन्ही गोष्टी दक्षिणेत एकमेकांसाठीच आहेत, असे कधी कधी वाटते. कारण केरळ, तेलंगणा, कर्नाटकात सिनेस्टार फारसे राजकारणात दिसणार नाहीत; पण तामिळनाडू, आंध्रमध्ये त्यांची परंपरा आहे. मात्र दक्षिणेतील कुठल्याही भाषेतील सिनेमा घेतला तर राजकीय विषयावरील अनेक चित्रपट पाहायला मिळतात. त्यात निडर अधिकारी, राजकारणातील डावपेच खेळणारे हिरो अशी अनेक चित्रे ते रंगवतात आणि लोकांच्या शिट्ट्याही घेतात. अशाच फिल्मस्टारचा तामिळनाडूच्या राजकारणात झालेला प्रवेश आणि थेट मुख्यमंत्री होण्याचा प्रसंग अलीकडेच देशाने पाहिला. पहिल्याच प्रयत्नात एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न जोसेफ विजय यांनी पूर्ण केले. विजय यांची सिनेमातील कामेही रजनीकांत यांच्यासारखी हक्काने शिट्ट्या घेणारी आहेत. तामिळनाडूतील राजकीय बदलानंतर कर्नाटकातही एक मोठी घडामोड झाली. कर्नाटकाच्या राजकारणातील ‘फिल्मी स्टाईल’चा निडर नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते डी. के. शिवकुमार कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले आहेत. सिद्धरामय्या यांनी फार आढेवेढे न घेता मुख्यमंत्रिपद सोडले. काँग्रेससाठी संकटमोचक असलेल्या शिवकुमार यांना दोन वर्षांचे मुख्यमंत्रिपद दिले गेले. त्यांच्याच नेतृत्वाखाली कर्नाटकात २०२८ ची निवडणूक लढवली जाईल. शिवकुमार यांनी सध्या कर्नाटकातील इतर नेत्यांच्या लोकप्रियतेवर मात केल्यामुळे कदाचित ते पुढेही कर्नाटकात काँग्रेसची सत्ता कायम राखतील. एका दक्षिणेतल्या चित्रपटातील नायकाचे पात्र असावे, तसाच शिवकुमार यांचा प्रवास आहे. त्यांनी काँग्रेससोबत राहून प्रामाणिकपणा दाखवला, वेळोवेळी काँग्रेसला ‘संकटमोचक’ म्हणून हात दिला. कोणाशीही टक्कर घेण्याची ताकद ठेवणारा हा नेता मोदी आणि शहा यांनाही भिडला. मुंबईत जाऊन तिथेही तिथल्या पोलिसांना ‘मी फक्त काळीज घेऊन आलोय,’ असे निडरपणे सांगणाऱ्या या फिल्मी वाटणाऱ्या राजकीय नेत्याने कर्नाटकात नवे पर्व सुरू केले आहे. डी. के. शिवकुमार कर्नाटकाला विकासाचा नवा मार्ग दाखवतात का आणि दाखवतील तर तो मार्ग कसा असेल, हेही पाहणे तितकेच कुतूहलाचे ठरणार आहे.
देशात भाजपची दडपशाही सुरू असताना आणि त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांवर ईडीचा बडगा उगारला जातो याची कल्पना असतानाही शिवकुमार यांनी कधीही कारवाईची तमा बाळगली नाही. भाजपने त्यांना तुरुंगातही डांबले, पण त्यांचा रुबाब आणि स्वाभिमान ईडी तोडू शकली नाही. त्यामुळेच शिवकुमारने कर्नाटकात काँग्रेसचे शिवधनुष्य पेलून मागच्या निवडणुकीत सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली. २००२ मध्ये शिवकुमार त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मदतीला धावले होते. आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी ४० आमदारांना सुरक्षितपणे बंगळुरूत ठेवण्याची जबाबदारी त्यावेळी शिवकुमार यांनीच पार पाडली. कर्नाटकाच्या राजकारणातल्या या ‘बाहुबली’ने देवगौडा यांनाही पराभूत करण्याचे सामर्थ्य दाखवले. माणसाकडे पुरेसा पैसा असायला हवा, या ठाम मताचे शिवकुमार यांनी नेहमी आर्थिक मजबुतीला महत्त्व दिले. पूर्वीपासून जमिनीमध्ये गुंतवणूक करणारे आणि मित्रांनाही तोच सल्ला देणारे शिवकुमार आपल्या या सवयीमुळेच कर्नाटकातील सर्वांत श्रीमंत राजकारणी बनले. पैसा किती महत्त्वाचा असतो, हे शिवकुमार यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज सर्वांत श्रीमंत आमदाराकडेच कर्नाटकाचे मुख्यमंत्रिपद आले, हा पूर्ण योगायोग नाही. त्यासाठी शिवकुमार यांनीही बरीच मेहनत घेतली आहे. २०१७ मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अहमद पटेल यांना गुजरातमधून जिंकायचे होते, पण भाजपशी दोन हात करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती. आताच्या स्थितीत तर नाहीच, असेच एकूण चित्र आहे. पण शिवकुमार यांनी ही जोखीम स्वीकारली. गुजरातमधील ४४ आमदारांना शिवकुमार यांनी आपल्या ताब्यात ठेवले. त्यानंतर अन्य एका प्रकरणात काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू होते, त्यावेळी एका आमदाराने मुंबई गाठली, तेव्हा त्यांच्या पाठोपाठ शिवकुमार मुंबईला दाखल झाले आणि ते हॉटेलबाहेर उभे राहिले. दक्षिणेतल्या सिनेमासारखीच ही घटना होती. त्यावेळीही भाजपला टक्कर देण्याचे धाडस शिवकुमार हेच दाखवू शकले. आपल्या अशा वागणुकीमुळे त्यांनी भाजपशी थेट वैर घेतले आणि तुरुंगातही गेले. आपल्या पक्षासाठी सर्व काही करण्यासाठी नेहमी ढाल बनून उभा राहणारा हा नेता काँग्रेसकडे आहे, हे काँग्रेसचे नशीब. मुख्यमंत्री झाल्यामुळे काँग्रेसला शिवकुमार यांच्या अनुभवाचा, त्यांच्या रणनीतींचा फायदाच होऊ शकेल. त्यामुळेच शिवकुमार यांच्याकडे देशातील राजकीय लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.