
रविवारी पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरले खरे, मात्र मैदानाबाहेरील चित्र क्रिकेट विश्वाची चिंता वाढवणारे आहे. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात २०२६ चा हंगाम आतापर्यंतचा सर्वात मोठा निराशाजनक ठरला आहे. एकेकाळी क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली आणि मनोरंजनाचे प्रमुख साधन असलेली ही स्पर्धा यंदा आपला प्रभाव गमावलेली दिसली. एका आघाडीच्या अहवालानुसार, आयपीएलच्या सुवर्ण दिवसांना आता ओहोटी लागली असून एका बड्या फ्रेंचायझी मालकाने तर, ‘आयपीएलचे सुवर्ण दिवस आता संपले आहेत,’ अशा स्पष्ट शब्दांत बीसीसीआयला घरचा आहेर दिला आहे.
सततचे क्रिकेट, वाढती महागाई आणि जाहिरातींचा अतिरेक यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची अनास्था पाहायला मिळाली. गेल्या हंगामात टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्यांची संख्या १.०५ कोटी इतकी होती, ती यंदा थेट २६ टक्क्यांनी घसरून ८० लाखांहून खाली आली आहे. यंदाच्या हंगामात पार्ले आणि कोका-कोला यासारख्या तब्बल ४४ मोठ्या ब्रँड्सनी आयपीएलची साथ सोडली. काही नवीन ब्रँड्सनी स्पर्धेत प्रवेश केला असला, तरी एकूण प्रायोजकत्वात ३१ टक्क्यांची प्रचंड घसरण झाली आहे. मागील वर्षी जाहिरातींच्या माध्यमातून सुमारे ६,००० कोटी रुपयांची घसघशीत कमाई झाली होती, यंदा त्यात तब्बल ५०० कोटी रुपयांची मोठी घट नोंदवली गेली. टीव्हीप्रमाणेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला. ‘जिओ हॉटस्टार’वर जाहिरातींचा इतका भडिमार होता की, एकाच सामन्यात एकाच जाहिरातीची तब्बल ४०-४० वेळा पुनरावृत्ती झाली. त्यातच सामन्याचा मूळ आवाज आणि जाहिरातींचा कर्णकर्कश आवाज यातील तफावतीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, बाजारात प्रायोजकच उरले नसल्यामुळे जिओ हॉटस्टारला आपल्या प्लॅटफॉर्मवरील ३८.८६ टक्के रिकामी ‘अॅड इन्व्हेंटरी’ स्वतःच विकत घेण्याची नामुष्की ओढवली. यंदा ‘ड्रीम ११’ आणि तत्सम फँटसी लीग्सच्या अनुपस्थितीचा मोठा फटका स्पर्धेला बसला. प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून असणारे सुमारे ५ कोटी सक्रिय युजर्स या लीग्सअभावी स्पर्धेपासून दूर गेले. फलंदाजांना पूरक ठरणाऱ्या अत्यंत सपाट खेळपट्ट्या आणि छोटी मैदाने यामुळे सामन्यांमधील चुरस संपली. प्रत्येक सामन्यात सहजपणे पार होणारी २०० धावसंख्या प्रेक्षकांसाठी कंटाळवाणी ठरली. टी-२० विश्वचषक नुकताच संपल्यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘क्रिकेटचा अतिरेक’ झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
एकंदरीत पाहता, यंदाच्या आयपीएलने प्रेक्षकांच्या मनावर म्हणावी तशी छाप सोडली नाही. या संपूर्ण स्पर्धेत क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहण्यासारखी एकमेव गोष्ट ठरली ती म्हणजे १५ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी. मात्र, राजस्थान रॉयल्स संघ अंतिम सामन्यात पोहोचू न शकल्याने तेथेही चाहत्यांचा पुरता हिरमोडच झाला. यंदाच्या हंगामातील ही घसरण पाहता, आयपीएलचे भविष्य आणि त्याचे ढासळते अर्थकारण सावरण्यासाठी बीसीसीआयला आता आगामी काळात मोठे फेरबदल करावे लागणार, हे मात्र नक्की.
- प्रवीण साठे