गोमंतकीय प्रादेशिक अस्मितेचा फिनिक्स की वाताहत?

आरजी पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेईल का, हे येणारा काळ आणि विधानसभा निवडणूकच ठरवेल, पण जमिनीच्या राजकारणात दुय्यम स्थानी असलेल्या 'नाही रे' वर्गाची दुर्दम्य रिव्होल्युशन भावना या घटनेने संपूर्ण मातीमोल केली इतके नक्की.

Story: विचारचक्र |
28th May, 11:21 pm
गोमंतकीय प्रादेशिक अस्मितेचा फिनिक्स की वाताहत?

मागच्या आठवड्यातील रिव्होल्युशन गोवन्स पक्षाच्या (आरजी) पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष मनोज ऊर्फ तुकाराम परब यांनी संस्थापक सदस्य व अध्यक्ष या दोन्ही पदांचा राजीनामा देऊन आपली राजकीय निवृत्ती घोषित केली. यातून एका दगडात अनेक पक्षी मारले गेले. गेल्या चार वर्षांपासून जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी आरजीने ग्रासलेल्या सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्र्यांना आनंद झाला. ज्या पक्षाची पारंपरिक मते प्राप्त करून आरजीने बाळसे धरले, त्या काँग्रेसच्या गोटात आज आनंद पसरला. आरजी पक्षात ज्यांना मनोज परब नकोसे झाले होते, त्यांना या राजकीय संन्यासाची बातमी ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटल्या, यात शंका नाही.

पण पक्षाची ही वाताहत असाधारण आहे का? याआधीही प्रादेशिक पक्षांची अनेक शकले होऊन अशी वाताहत झाली होती का? बाहुबल अन् आर्थिक शक्ती, राजकीय विचारसरणी व सार्वजनिक स्वीकारार्हता या सर्व गोष्टी जुळून आल्या तरीही प्रादेशिक पक्ष का बरे ढेपाळतात? गोव्यात अल्पसंख्याक कॅथलिक ख्रिश्चन समाजाचा स्वतःचा कायमस्वरूपी सामाजिक-राजकीय दबाव गट असूनही हा समाज राजकीयदृष्ट्या नेहमी चलनातून बाद होतो, याचे कारण काय असावे? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे गोवेकरांना कधी ना कधी तरी शोधावीच लागतील.

राजकारणात सत्ता आणि पैसा कितीही श्रेष्ठ म्हटला अन् मानला, तरीही राजकीय संघटनेला काहीतरी वैचारिक अधिष्ठान असावे लागते. जनाधार, संघटना, राजकीय विचारसरणी, समर्थक मतदारांचा लोकसमूह व समाजाच्या सर्व स्तरांतील स्वीकारार्हता ही कोणत्याही पक्षाच्या दीर्घायुष्यासाठी कारक व तारक ठरते.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानंतर गेल्या ६५ वर्षांत गोव्याच्या राजकारणात एक नवीन प्रादेशिक राजकीय विचार घेऊन आलेला हा पक्ष एक असाधारण राजकीय प्रवाह निर्माण करेल, याविषयी गोव्यातील राजकीय विचारवंत, अभ्यासक व बुद्धिवंत वर्गाला प्रचंड आशा होती. गोमंतकीय जनतेनेही परिवर्तन होईल या आशेने पहिल्याच निवडणुकीत या पक्षाला तब्बल दहा टक्के मतांचे दान केले. पण सहा वर्षांत पक्षांतर्गत हेवेदावे चव्हाट्यावर आले. युगो, मगो या पक्षांत कितीवेळा फूट पडली, याला तर गणना नाही. २०२२ नंतर गोव्यात प्रथमच अशी परिस्थिति निर्माण झाली की प्रादेशिक पक्षांमधून आमदार फुटून राष्ट्रीय पक्षात सामील झाले नाहीत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने उतरलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे दोन आमदार २०१९ साली भाजपने हातोहात 'आपलेसे' केले, तसेच मगो पक्षही फुटला.

१९८० व १९९० च्या दशकात तर मगो पक्ष अनेकदा फुटला. शशिकलाताईंनी मगो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विरोध सहन करावा लागला. नंतर त्या स्वतः काँग्रेसवासी झाल्या, पण विल्फ्रेड डिसोझा यांच्याशी न पटल्याने बाहेर पडून त्यांनी 'भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्ष' स्थापन केला. परत मगो पक्षात प्रवेश करण्यासाठी त्यांनी हा पक्ष मगोत विलीन केला.

काँग्रेसपासून फारकत घेऊन सात आमदारांसह फुटून लुईस प्रोतो बार्बोझा यांनी 'गोवा पीपल्स पार्टी' हा पक्ष स्थापन केला होता. पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करून बार्बोझा मुख्यमंत्रीही झाले, पण ते पाच वर्षे पूर्ण करू शकले नाहीत.

गोवा मुक्तीनंतर सुमारे ५० टक्के लोकसंख्या व आज जवळपास २५ टक्के असलेल्या अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना ही कायम राहिली. चर्चिल आलेमाव, लुईस प्रोतो बार्बोझा, डॉ. विल्फ्रेड डिसोझा, लुईझिन फालेरो, फ्रान्सिस्क सार्दिन असे अनेक दिग्गज नेते काँग्रेसमध्ये राहून, काँग्रेस फोडून व काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करून मुख्यमंत्री झाले, पण त्यांची सरकारे अडीच वर्षांहून जास्त काळ टिकली नाहीत. गोव्यात आजतागायत एकाही ख्रिस्ती मुख्यमंत्र्याने आपल्या मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण केली नाहीत. अल्पसंख्याकांचा कैवारी पक्ष असूनही काँग्रेस ठामपणे अल्पसंख्याक नेत्याला गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ देऊ शकली नाही, हा इतिहास आहे.

आरजीला अल्पसंख्याक समाजातून भरघोस प्रतिसाद व पाठिंबा मिळाला, हे कोणताही राजकीय निरीक्षक मान्य करेल. पण हा पाठिंबा मिळाल्यावर सासष्टी, बार्देश, तिसवाडी व मुरगाव या ख्रिस्तीबहुल मतदारसंघांत जे काही सोशल इंजिनिअरिंग करण्याची आवश्यकता होती, त्याला पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने तितकेसे महत्त्व दिले नाही; तरीही ख्रिस्ती मतदार ठामपणे आरजीच्या मागे आला. आज आरजी हा एक प्रादेशिक पक्ष म्हणून गोवा फॉरवर्ड व मगो या पक्षांपेक्षा अधिक लोकप्रिय आहे, पण पक्षाची संघटनात्मक संरचना, गावपातळीपर्यंत पक्षाची बांधणी करून पक्षाचे केडर मजबूत करणे, माध्यमांशी योग्य प्रकारे संपर्क ठेवणे, या गोष्टी पक्षपातळीवर व्हायला हव्या होत्या, त्या झाल्या नाहीत. जशी गोव्याच्या इतर प्रादेशिक पक्षांची वाताहत झाली तीच, तशाच प्रकारची वाताहत आज आरजीची होताना दिसते.

गोमंतकीय रोमन कॅथलिक ख्रिश्चन राजकारण्यांनी कधीही गंभीरपणे राजकारण केले नाही. सतत राजकीय कोलांट्याउड्या, राजकीय कटकारस्थाने यातच ख्रिस्ती नेते अडकून राहिले.

गोवेकर, विशेषतः अल्पसंख्याक व बहुजन हिंदू समाजातील वंचित वर्गाला या पक्षाचा आधार वाटत होता, कारण गोव्याचे जमीनविषयक प्रश्न सोडवण्याची पुरेपूर क्षमता त्यांना या पक्षात दिसत होती. त्यासाठी या मतदारवर्गाने आरजीने गरीब परप्रांतीय मजूर व कुशल कामगारांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला पाठिंबाही दिला.

युगो, सेव्ह गोवा फ्रंट, गोवा फॉरवर्ड आणि आता आरजी अशी अल्पसंख्याक व बहुजनांच्या राजकारणाची ही नौका आरजीच्या फुटण्याने दिशाहीन झाली असे म्हणायला वाव आहे. 'जल, जंगल और जमीन' या तिन्ही नैसर्गिक स्रोतांच्या मुळावर उठलेला भूमाफिया अंगावर घेण्यासाठी एक रांगडा, उमदा, तरुण राजकीय प्रादेशिक पर्याय गोवेकरांना उपलब्ध झाला होता, पण या बंडाने तीही आशा मावळली आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. काँग्रेसच्या खांद्यावर बसून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाला मर्यादा आहेत आणि तो पक्ष फार मजल मारू शकणार नाही, हे मागच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. सुमारे पंधरा मतदारसंघांत थेट प्रभाव असलेल्या ख्रिस्ती समाजाला आता निरुपायाने काँग्रेसच्या मागे जावे लागेल, असे चित्र पाहायला मिळत आहे.

या सुंदोपसुंदीतून, फंदफितुरीतून आरजी पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेईल का, हे येणारा काळ आणि विधानसभा निवडणूकच ठरवेल, पण जमिनीच्या राजकारणात दुय्यम स्थानी असलेल्या 'नाही रे' वर्गाची दुर्दम्य रिव्होल्युशन भावना या घटनेने संपूर्ण मातीमोल केली इतके नक्की. हिंदू आणि ख्रिस्ती मतांचे काही ठिकाणी एकीकरण व सर्व ठिकाणी ध्रुवीकरण करणारा हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, ही आशा बाळगायला हरकत नाही. तूर्तास इतकेच.


- प्रा. विघ्नेश शिरगुरकर, (लेखक कथालेखक, अनुवादक आणि कवी आहेत.)