व्यवस्थेच्या दारात वृद्धांची फरफट

Story: राज्यरंग - छत्तीसगड |
28th May, 11:20 pm
व्यवस्थेच्या दारात वृद्धांची फरफट

ओडिशाच्या केओंझर जिल्ह्यात बहिणीच्या बँक खात्यातील १९ हजार रुपये काढण्यासाठी हतबल झालेल्या भावाने तिच्या मृत्यूनंतर तिचा सांगाडा कबरीतून बाहेर काढला आणि चक्क खांद्यावर घेऊन थेट बँक गाठली होती. एप्रिलमधील ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा व्यवस्थेतील त्रुटी दाखवणारी घटना छत्तीसगडमध्ये सुरगुजा (अंबिकापूर) जिल्ह्यातील कुणवा गावात घडली आहे.

सरगुजा जिल्ह्यातील मैनपाट भागात ९० वर्षांच्या सासूच्या पेन्शनच्या बायोमेट्रिक पडताळणीसाठी (अंगठ्याचा ठसा) तिच्या ५० वर्षांच्या सुखमनिया नावाच्या सुनेने तिला पाठीवर घेऊन पाच किलोमीटर पायपीट केली. ४२ अंश सेल्सिअस तापमानात या सुनेने जंगलातील खडकाळ रस्ते, नदी-नाले पार करत सासूला बँकेपर्यंत नेले. सासूला पाठीवर घेऊन रणरणत्या उन्हात चालणाऱ्या सुनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला आहे.

आपली व्यथा मांडताना सून सुखमनिया म्हणाली, यापूर्वी एक बँक प्रतिनिधी दरमहा घरी येऊन सासूबाईंचे ५०० रुपये निवृत्तीवेतन देऊन जात असे; परंतु गेल्या ३-४ महिन्यांपासून हे निवृत्तीवेतन येणे बंद झाले होते. कारण विचारले असता ‘केवायसी’चे सोपस्कार पूर्ण झाले नसल्याचे सांगण्यात आले. बँकेतून पेन्शन मिळवण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी किंवा प्रत्यक्ष हजेरी अनिवार्य होती. गावामध्ये वाहतुकीचे कोणतेही साधन किंवा रस्ते नसल्यामुळे तसेच सासूचे चालणे-फिरणे पूर्णपणे बंद असल्याने सासूला पाठीवर वाहून नेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अखेर सासूला मी पाठीवर घेतले आणि सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील मैनपाट शहरातील ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ची शाखा गाठली.

या संवेदनशील प्रकरणावर मैनपाट जनपद पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी खुशबू शास्त्री यांनी सांगितले, यापूर्वी 'बँक मित्र' दरमहा या वृद्ध महिलेच्या घरी जाऊन निवृत्तीवेतन पोहोचवत होता. जानेवारीत शेवटचे निवृत्तीवेतन घरपोच देण्यात आले. ‘केवायसी’ प्रलंबित असल्यामुळे चार महिन्यांपासून ही सेवा खंडित झाली होती. २२ मे रोजी सुखमनिया कोणालाही पूर्वकल्पना न देता थेट आपल्या सासूला पाठीवर घेऊन बँकेच्या शाखेत पोहोचली. तिची ही अवस्था पाहून बँकेत तातडीने ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि तिच्या सासूचे ४ महिन्यांचे प्रलंबित असलेले एकूण २,००० रुपये त्यांना देण्यात आले. देशात डिजिटल क्रांतीचे ढोल बडवले जात असताना दुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन काढताना डिजिटल अडचणी आणि बायोमेट्रिक समस्यांचा सामना करावा लागावा, हे लज्जास्पद आहे.

- प्रदीप जोशी