कॉक्रोच जनता पार्टी हे आभासी व्यासपीठ !

भारतीय राजकारणात व्यंगचित्रे, कॉमेडी आणि राजकीय खिल्ली यांची परंपरा जुनी आहे. पण सोशल मीडियामुळे त्याचा वेग आणि प्रभाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सरकार, न्यायव्यवस्था आणि सोशल मीडिया कंपन्या यांच्यात नवा संघर्ष उभा राहत आहे.

Story: विचारचक्र |
27th May, 11:39 pm
कॉक्रोच जनता पार्टी हे आभासी व्यासपीठ !

कॉक्रोच जनता पार्टी हा सध्या भारतातील सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला डिजिटल-राजकीय ट्रेंड बनला आहे. हा अधिकृत राजकीय पक्ष नसून, व्यंग, संताप, बेरोजगारी, पेपरफुटी आणि युवकांच्या असंतोषातून जन्मलेली एक ऑनलाइन चळवळ मानली जात आहे. विशेषतः नवी पिढी आणि तरुण वर्गामध्ये याला मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे मानले जाते.

या ट्रेंडची सुरुवात सर्वोच्च न्यायालयातील एका वादग्रस्त टिप्पणीपासून झाली. काही माध्यमांनुसार, बेरोजगार युवकांबाबत कॉक्रोच (झुरळ) किंवा पेरासाईट असा संदर्भ आल्याने सोशल मीडियावर संताप उसळला. नंतर स्पष्टीकरण देण्यात आले की टिप्पणी बनावट पदव्या घेणाऱ्यांबाबत होती; मात्र तोपर्यंत हा शब्द मीम्स, व्यंगचित्रे आणि आंदोलनाचे प्रतीक बनला होता. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके नावाच्या व्यक्तीने कॉक्रोच जनता पार्टी नावाने सोशल मीडिया हँडल सुरू केले. सुरुवातीला हा विनोद आणि व्यंग म्हणून पाहिला गेला; पण काही दिवसांतच लाखो तरुण त्याच्याशी जोडले गेले. मात्र त्याची पक्ष म्हणून अधिकृत नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. त्यांच्याकडे संघटनात्मक रचना, निवडणूक चिन्ह किंवा उमेदवारही नाहीत. तरीसुद्धा हा ट्रेंड एवढा वाढला की अनेकांना तो खरा राजकीय पर्याय वाटू लागला. कारण त्याने तरुणांच्या मनातील दडपलेला राग व्यक्त केला. 

आजचा युवक काही प्रश्नांनी त्रस्त आहे. बेरोजगारी, पेपरफुटी, स्पर्धा परीक्षांमधील अनिश्चितता, वाढती महागाई, सोशल मीडियावरील दडपशाही अशा समस्या नव्या पिढीला सतावत आहेत. तुम्ही आळशी आहात, असे नेटकऱ्यांना संबोधणे हेही त्यामागचे कारण असू शकते. कॉक्रोच जनता पार्टीने अशा मुद्द्यांवर व्यंगात्मक पद्धतीने हल्ला चढवला. त्यामुळे अनेक युवकांना हा आपला आवाज आहे असे वाटू लागले.

भारतीय राजकारणात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर मीम्स, रील्स, इंस्टाग्राम पोस्ट आणि इंटरनेट स्लँग यांच्या माध्यमातून राजकीय संदेश दिले जात आहेत. मी सुद्धा झुरळ आहे किंवा कॉक्रोच म्हणजे आळशी आणि बेरोजगारांचा आवाज यांसारखी घोषवाक्ये ट्रेंड झाली. पूर्वी राजकीय पक्ष रॅली, पोस्टर, टीव्ही जाहिराती वापरत होते; आता डिजिटल पिढी मीम्स आणि व्हायरल कंटेंटद्वारे राजकीय संवाद घडवत आहे. याचाच अर्थ असा की आजचा युवक विचार करतो कमी आणि व्हायरल करतो जास्त असे म्हणता येणार नाही. तर तो आपल्या भाषेत राजकारण मांडतो असे म्हणावे लागेल.

काही विरोधी पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन दिल्याच्या बातम्या समोर आल्या. समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या ट्रेंडबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे वृत्त आले. मात्र यामुळे दुसरी चर्चा सुरू झाली आहे की, ही खरी जनचळवळ आहे का, की सत्ताविरोधी सोशल मीडिया मोहीम? काही जणांच्या मते, हा युवकांचा नैसर्गिक संताप आहे. तर दुसऱ्या बाजूचे मत असे की, सोशल मीडिया अल्गोरिदम, ट्रोल नेटवर्क आणि डिजिटल प्रचार यामुळे हा ट्रेंड कृत्रिमरीत्या वाढवला गेला. 

या विरोधात न्यायालयात धाव घेणे किंवा टीका करणे यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, लोकशाहीत व्यंग आणि टीका कितपत सहन केली जावी? भारतीय राजकारणात व्यंगचित्रे, कॉमेडी आणि राजकीय खिल्ली यांची परंपरा जुनी आहे. पण सोशल मीडियामुळे त्याचा वेग आणि प्रभाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सरकार, न्यायव्यवस्था आणि सोशल मीडिया कंपन्या यांच्यात नवा संघर्ष उभा राहत आहे.

कॉक्रोच जनता पार्टी निवडणुका लढवेल का? खरा पक्ष बनेल का? सध्या तरी त्याची शक्यता कमी वाटते. कारण ऑनलाइन लोकप्रियता आणि प्रत्यक्ष राजकारण यात खूप अंतर असते. भारतात अनेक डिजिटल ट्रेंड काही दिवसांत संपतात. तरीसुद्धा या नव्या आभासी संघटनेचे महत्त्व कमी होत नाही. कारण त्याने काही कटू वास्तव समोर आणले.

युवक प्रचंड अस्वस्थ आहेत, बेरोजगारी हा खरा स्फोटक मुद्दा आहे, पेपरफुटीमुळे व्यवस्थेवरील विश्वास ढासळत आहे, सोशल मीडिया आता पर्यायी राजकीय व्यासपीठ बनत आहे, असे चित्र उभे केले जात आहे, त्यात तथ्य किती हा खरा प्रश्न आहे. या कथित पक्षाचे संस्थापक कोण आहेत आणि ते काय करतात, यावर नजर टाकली तर वस्तुस्थिती समोर येते. सोशल मीडीयावर उपलब्ध माहितीनुसार, यापैकी एक ध्रुव राठी जर्मनीमध्ये राहतो, दुसरा अभिजीत दिपके अमेरिकेत राहतो. तिसरा अप्रीत शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. या तिन्ही कोक्रोचना वाटते की भारतातील तरुणांनी शिक्षण अर्धवट सोडून आंदोलन, दंगली आणि निदर्शनांमध्ये सहभागी होऊन पोलीस केसेस अंगावर घेत स्वतःचे करिअर धोक्यात घालावे. 

ध्रुव राठी जर्मनीत बसून भारताला लोकशाही शिकवतो, अभिजीत दिपके अमेरिकेतून इथल्या तरुणांना आंदोलनासाठी पेटवतो आणि अप्रीत शर्मा ऑस्ट्रेलियात सुरक्षित आयुष्य जगत भारतातल्या मुलांना रस्त्यावर उतरा असा सल्ला देतो. या तिन्ही कॉक्रोचनी स्वतःच्या करिअरची, सुरक्षिततेची आणि डॉलर-युरोची पूर्ण व्यवस्था परदेशात करून ठेवायची आणि भारतातल्या मध्यमवर्गीय मुलांनी पोलिसांच्या लाठ्या खाव्यात, केसेस अंगावर घ्याव्यात, करिअर धोक्यात घालावे अशी अपेक्षा ठेवायची. हे कॉक्रोच लोक ना युवकांच्या जामिनासाठी येणार, ना ते त्यांच्या आईवडिलांना समजावणार, ना त्यांच्या नोकरीची भरपाई करणार. 

सोशल मीडियावर रील्स, ट्वीट्स आणि भावनिक भाषणे देणे खूप सोपे असते, पण जमिनीवर उतरून परिणाम भोगावे लागतात ते सामान्य मुलांना. काही विश्लेषकांनी या पक्षाची तुलना अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाशी केली आहे. फरक इतकाच की ते आंदोलन रस्त्यावर होते; हे आंदोलन इंटरनेटवर आहे. हा राजकीय पक्ष नव्हे तर आभासी व्यासपीठ आहे, असे म्हणता येईल.


- गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४