पर्यटकांवरील हल्ले रोखणे गरजेचे

देशी पर्यटकांना त्रास होणार नाही आणि विनाकारण त्यांची सतावणूक होणार नाही, यासाठी राज्य सरकारने वेळीच काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पोलीस, पर्यटन खाते आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे काम करून पर्यटकांवर होणारे हल्ले रोखणे गरजेचे आहे, अन्यथा गोव्याच्या हातातून पर्यटन व्यवसाय निसटण्यासाठी वेळ लागणार नाही.

Story: संपादकीय |
26th May, 09:33 pm
पर्यटकांवरील हल्ले रोखणे गरजेचे

गोव्यातील पर्यटन व्यवसायात पर्यटकांना मारहाण करण्याचे प्रकार नवे नाहीत. मागील काही वर्षांत अशा कितीतरी घटना घडल्या आहेत. पोलीस अनेक प्रकरणे मिटवतात, पण काही प्रकरणात मारहाण करण्यापासून ते खून करण्यापर्यंतही घटना घडलेल्या आहेत. गोव्यातील स्थानिकांकडून पर्यटकांची सतावणूक होते. क्षुल्लक कारणांवरून देशी पर्यटकांचा अपमान करणे, त्यांना हिणवणे, त्यांच्याशी हुज्जत घालणे, त्यांना मारहाण करणे असे प्रकार घडत आहेत. गोव्यातील पर्यटन हे देशी पर्यटकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ही गोष्ट स्थानिकांनी नाकारू नये. रोज देशी पर्यटकांची धिंड काढता, पण त्यांच्याच उलाढालीवर गोव्यातील पर्यटन क्षेत्र अवलंबून आहे, हे सत्य आधी स्वीकारावे लागेल. जे पर्यटक हुल्लडबाजी करतात, नियम मोडतात त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस यंत्रणा आहे. मात्र काहीतरी निमित्त करून देशी पर्यटकांना मारहाण करणे, त्यांची अडवणूक करणे, सतावणूक करणे या गोष्टी थांबायला हव्यात. आधीच किनारी भागात टाऊट्सकडून पर्यटकांची सतावणूक होते. त्यात मिळेल तिथे स्थानिक लोक पर्यटकांना अडवून धमकावू लागले आणि मारहाण करू लागले, तर गोव्यातील पर्यटन क्षेत्राची अधोगती कोणीही रोखू शकणार नाही. 

ज्या देशी पर्यटकांना 'भिकणाकार' आणि 'घाटी' म्हणून हिणवतात, त्याच पर्यटकांच्या उलाढालीवर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा आहे. २०२५ च्या आकडेवारीनुसार गोव्यात १.०२ कोटी देशी पर्यटक आले तर ५.१७ लाख विदेशी पर्यटक आले. श्रीलंकेत २०२२ मध्ये ७.२ लाख विदेशी पर्यटकांनी भेट दिली होती. ही संख्या त्यानंतर सलग तीन वर्षे मोठ्या प्रमाणात वाढत राहिली आहे. २०२५ मध्ये विक्रमी २३.६ लाख विदेशी पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली. गोव्याने असा बदल पाहिलेला नाही. अस्वच्छता, स्थानिकांकडून होणारी सतावणूक, क्लब, शॅकमध्ये होणारे गैरप्रकार, पोलिसांकडून होणारी सतावणूक अशा अनेक गोष्टी गोव्यातील पर्यटन क्षेत्राबाबत चिंता व्यक्त करायला भाग पाडत आहेत. ‘पेड इन्फ्ल्यूएन्सर’च्या माध्यमातून गोव्याची होणारी बदनामी ही आधीच गोव्याला त्रासदायक ठरत असताना स्थानिकांकडून वारंवार होत असलेल्या पर्यटकांना मारहाणीच्या घटना गोव्याच्या पर्यटनाला धोक्याचा इशारा देत आहेत, हे समजून घ्यायला हवे. 

सावंतवाडीतून आलेल्या पर्यटकांना मोरजीमध्ये मारहाण होते आणि पोलीस तक्रारही घेत नाहीत, त्यानंतर पत्रादेवी येथे येऊन सिंधुदुर्गातील लोक ‘रास्ता रोको’ करतात, या गोष्टीमुळे गोव्याची प्रचंड बदनामी झाली आहे. त्याचवेळी कोलवा येथील हॉटेलमध्ये पर्यटक झोपलेले असताना कर्मचारी मास्टर की वापरून त्यांच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रकारची तक्रार करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. रोज गोव्यातील कोणती ना कोणती घटना सोशल मीडियावर येत असते. स्थानिक त्या घटनांकडे पाहताना पर्यटकांचीच चूक म्हणून पाहू लागले, तर गोव्यातील पर्यटन व्यवसायावर माशा मारत बसण्याची वेळ येईल. पर्यटन क्षेत्रात शिस्त हवी. ती शिस्त येण्यासाठी पर्यटन खाते आणि पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. मोरजीत जो सावंतवाडीतील पर्यटकांना मारहाणीचा प्रकार घडला, तो अत्यंत निंदनीय आहे. लहान मुलांवरही संशयितांनी बाटल्या फेकून मारल्या, यावरून स्थानिकांच्या नावाखाली काही लोक कोणत्या थरापर्यंत जात आहेत, याची जाणीव लोकांना व्हायला हवी. गोव्यातील लोक जेव्हा पर्यटनासाठी इतर राज्यांमध्ये जातात, तिथे गोव्यातील लोकांना जो मान-सन्मान मिळतो तसा मान गोव्यातील लोक इतर राज्यांतून आलेल्या पर्यटकांना का देत नाहीत, असा प्रश्न पडतो. मान-सन्मान सोडाच, पण जे लोक गोव्यात पर्यटनासाठी येतात ते आपले पैसे खर्च करत असतात, किमान विनाकारण त्यांच्या वाटेला तरी जाऊ नये. मोरजीत घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून प्रकरण धसास लावण्याची गरज होती. तसे झाले असते, तर पत्रादेवी चेकपोस्टवर महाराष्ट्रातील लोक जमलेच नसते आणि गोव्याची बदनामीही झाली नसती. आमदार जीत आरोलकर यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आणि समेट घडवून आणला, ते काम पोलिसांनी करायला हवे होते. देशी पर्यटकांना त्रास होणार नाही आणि विनाकारण त्यांची सतावणूक होणार नाही, यासाठी राज्य सरकारने वेळीच काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पोलीस, पर्यटन खाते आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे काम करून पर्यटकांवर होणारे हल्ले रोखणे गरजेचे आहे, अन्यथा गोव्याच्या हातातून पर्यटन व्यवसाय निसटण्यासाठी वेळ लागणार नाही.