आज गोव्यातील पश्चिम घाटातील जंगलाचे इथल्या लोकमानसाच्या प्राणवायू आणि पेयजलाचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी ‘व्याघ्र राखीव क्षेत्राची निर्मिती’ हा माझ्या जगण्याचा श्वास आणि ध्यास आहे.

माझा जन्म १५ सप्टेंबर १९६५ साली छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या डिचोलीतील पाजवाड्यावर आतेच्या घरी झाला. अकाली मातापित्याचे छत्र हरवलेल्या आणि बेघर असलेल्या वडिलांनी त्यांच्या काकांच्या आग्रहाखातर घोटेली येथे घर बांधले. तत्पूर्वी विठ्ठल या चुलत आजोबांबरोबर मी गावसवाडा-केरी येथील जुन्या सामुहिक घरी जायचो, तेव्हा वाटेत नदी ओलांडावी लागे. मी त्यांना, ‘ही नदी कोठे उगम पावते, ही नदी कुणाच्या मालकीची?’ असे नाना प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. आमच्या जुन्या घराच्या सभोवताली सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगा होत्या. त्यामुळे वाघेरी, बोळेरीचो टेंब, मोर्लेगड, मिठाशेर यांच्याविषयी जाणून घेण्याची उर्मी माझ्या न कळत्या वयातच जडली; ज्याने सातत्याने पदभ्रमण, गिर्यारोहण करण्याच्या ओढीला चालना दिली. त्यामुळे २५ वेळा वाघेरी, १० वेळा मोर्लेगड, १० वेळा कसई नाथ, चार वेळा सोसोगड आणि त्यानंतर रावण (वेर्ले), जुनागड (नेत्रावळी), सिद्धनाथ (भाटी), टेळको गुणो (असोडे) यशस्वीपणे गिर्यारोहण केले. गोव्यातील ही प्रत्येक सह्याद्रीची शिखरे गिर्यारोहण करतेवेळी, माझ्या अंतरंगी सह्याद्रीविषयीच्या संवेदना रुजत गेल्या आणि त्यातून वयाच्या १५ वर्षांपासून पर्यावरणस्नेही पदभ्रमण आणि गिर्यारोहणाचे कार्यक्रम आयोजित करत गेलो. इच्छा एकच, माझ्या सह्याद्रीचे शाश्वत रक्षण व्हावे आणि त्यासाठी सक्षम पिढी लाभावी. १९८६ पासून अनेक पर्यावरणीय संवर्धन आणि संरक्षणाच्या चळवळीत सहभाग घेतला आणि त्याचे फलित म्हणून १९९९ साली म्हादई आणि नेत्रावळी या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यातील सदाहरित आणि संपन्न जंगलांचे
कायदेशीर रक्षण करण्याची अधिसूचना मंजूर करण्यास तत्कालीन राज्यपाल राजी झाले. त्यानंतर गोव्यात सत्तेवर आलेल्या सरकारचे म्हादई आणि नेत्रावळी अभयारण्यांचे लाभलेले सुरक्षा कवच हिरावून घेण्याचे प्रयत्न असफल ठरले.
आज गोव्यातील पश्चिम घाटातील जंगलाचे इथल्या लोकमानसाच्या प्राणवायू आणि पेयजलाचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी ‘व्याघ्र राखीव क्षेत्राची निर्मिती’ हा माझ्या जगण्याचा श्वास आणि ध्यास आहे. त्यादिवशी ८९१ मीटर उंचीच्या ‘अवचितगड’ या पाव शतकापूर्वी वयस्काकडून ऐकलेल्या पर्वतावर माझा प्रिय विद्यार्थी आणि सध्या श्रीगणेश विद्यालयाच्या भूगोल शिक्षक सुबोध नाईक याने विचारणा केली. शालेय जीवनात आपल्या शिक्षकांनी पेरलेली स्वप्ने, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काही मोजकेच विद्यार्थी कालांतराने प्रयत्न करतात, तर बहुतांश मळलेल्या वाटांनी जाणे पसंत करतात. शिक्षकी पेशात काम करताना माझ्यासोबत शालेय विद्यार्थी असलेले शुभदा च्यारी (नदी), चंद्रकांत शिंदे (देवराई), विठ्ठल शेळके (पशुपालक), सीताराम तोरस्कर (पुरातत्व) हे माझा व्यासंग घेऊन पुढे जात आहेत, ही आनंदवर्धक बाब आहे. डॉ. वरद सबनीस, डॉ. वासू उसपकर ही मंडळी पुरातत्व क्षेत्रात आपले कार्य पुढे नेत आहेत. गोव्यातील पर्वत शिखरांची उंची मोजणी नव्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाने करण्याचा संकल्प होता.
त्या दृष्टिकोनातून जेव्हा सुबोधने भूगोलाचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन, याविषयीची पदविका घेतली, तेव्हा मनाला खूप आनंद झाला. त्याला नव्याने गोव्यातील पर्वतशिखरांचे प्रत्यक्ष भेट देऊन, स्थानिक लोकांशी चर्चा आणि अवलोकन केल्यानंतर त्यांच्या उंचीसंदर्भातील वास्तव समोर आणण्याची विनंती केली आणि त्याने ती उत्स्फूर्तरीत्या स्वीकारली. त्यामुळे अवचितगडाच्या गिर्यारोहणाच्या मोहिमेत सहभागी होणे माझ्यासाठी आवश्यक बाब होती, त्यानुसार आम्ही सकाळी केरी, मोले, अनमोड, पायडामार्गे विरंझोळला पोहोचलो. तेथील वयस्क आणि जाणकार लिंगो गावडे यांच्यासह ११ च्या सुमारास कर्काचा ओहळ ओलांडून आम्ही यात्रा सुरू केली. घनदाट वृक्षीवेलींच्या सावलीमुळे चालणे सुसह्य वाटत असले, तरी हातपाय अनाहुतपणे रक्तबंबाळ झाले होते. सकाळी पर्जन्यवृष्टी झाल्याने पाल्यापाचोळ्यात अज्ञात स्थळी असलेल्या ५०-६० जळवा शरीराच्या जेथून सहजपणे रक्त शोषता येईल, त्या जागी तुटून पडल्या होत्या. निमुटपणे ही वेदना सोसत, हाती घेतलेली मोहिम पूर्ण करण्यासाठी पुढे जाणे गरजेचे होते. गोव्यातील म्हादई अभयारण्याच्या गेल्या कित्येक दशकांपासून अस्पर्श असलेल्या सदाहरित जंगलाचे, महाकाय वृक्षवेलींचे दर्शन चालण्याचा थकवा घालवणारे होते. शेवटी करंझोळ गावातील पडंगी सावड भागात जेथे अवचितगड आपले हातपाय पसरून उभा आहे, तिथे आम्ही पोहोचलो. मोहिम अर्धी फत्ते झाली. त्यामुळे अवचित गडाच्या भौगोलिक निश्चितीची जबाबदारी गजानन शेटयेने पार पाडली. पूर्वेला विरंझोळ, पश्चिमेला करंझोळ, दक्षिणेला तांबडी सुर्ल आणि उत्तरेला ५ किमी अंतरावरचा सोसोगड अशा हिरवाईच्या सान्निध्यात उभा असलेल्या अवचितगडाचे पावसामुळे निर्माण झालेल्या तलम धुक्याच्या चादरीत लपेटलेले रूप माझ्यासाठी खरोखर संस्मरणीय होते. गोमंत सह्याद्रीच्या वैभवाच्या खुणांचा धांडोळा घेण्याच्या माझ्या ईर्ष्येला सुबोध नाईक, गजानन शेट्ये, चंद्रशेखर गावस, वेदांत केरकर आणि सूर्यकांत गावकर यांच्या प्रयत्नांची सशक्त साथ लाभली.
सह्याद्रीच्या उत्तुंग कड्यांच्या, गगनभेदी शिखरांच्या वेडाने न कळत्या वयापासून आजतागायत मी त्याचे रूप, स्वरूप भव्यता, खोली जाणून घेण्यासाठी अस्वस्थ आहे. जेव्हा सह्याद्रीला जाणून घेण्यासाठी चळवळ सुरू केली, तेव्हा खूप जण होते. आता ही खडतर आणि यातनामय वाट चालताना खूप थकायला होते. बरेच समविचारी साथींचे मार्ग वेगळे झाले. माझ्यासाठी गेल्या पाच दशकांपासून हिरवेगार जंगल हे महत्त्वाचे ऊर्जास्रोत असून, त्याचे संवर्धन आणि संरक्षण गरजेचे असल्याने, ते साध्यासुध्या पदभ्रमण आणि गिर्यारोहणाने जाणून घेणे आणि त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सातत्याने वावरण्याचा माझा संकल्प आहे. जंगलातील काट्याकुट्यांमुळे तसेच जळवांच्या चाव्याने रक्तबंबाळ होणे नित्याचेच असते. पण शरीरात ऊर्जा असेपर्यंत ध्येयसिद्धीसाठी ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे’ या कवितेतील ओळीप्रमाणे मार्गक्रमण माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

- राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५