'नीट' परीक्षा गोंधळामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

मध्य प्रदेशातील घटना

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
19 mins ago
'नीट' परीक्षा गोंधळामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

'नीट' वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून देशातील विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव गंभीर रूप धारण करत आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे उद्भवलेल्या अनिश्चिततेतून मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील आकांक्षा चतुर्वेदी या २० वर्षीय विद्यार्थिनीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुन्हा परीक्षा देण्याचे माझ्यात धैर्य नाही, अशी हृदयद्रावक चिठ्ठी तिने लिहून ठेवली आहे.

आकांक्षाने ३ मे रोजी झालेल्या 'नीट' परीक्षेत ६५० पेक्षा अधिक गुण मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या अत्यंत गरीब कुटुंबाने मोठे आर्थिक कष्ट उपसले होते. वडील कृष्णकुमार चतुर्वेदी हे पेशाने शेतकरी असून, त्यांनी मुलीच्या नागपूर येथील कोचिंगसाठी 'किसान क्रेडिट कार्ड'द्वारे ३ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. इतकेच नव्हे, तर मुलीला आधार देण्यासाठी तिचे वडील नागपुरातच एका ठिकाणी स्वयंपाकी म्हणून काम करत होते. यंदा आकांक्षाला वैद्यकीय महाविद्यालयात हमखास प्रवेश मिळेल, अशी खात्री कुटुंबाला होती; मात्र १२ मे रोजी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने परीक्षा रद्द करून २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केल्याने आकांक्षा तीव्र नैराश्यात गेली होती.

घटनेच्या ठिकाणी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मम्मी-पप्पा, तुमची मुलगी शिकून डॉक्टर होईल असा तुम्हाला विश्वास होता. पण पुन्हा 'नीट' परीक्षा देण्याचे धैर्य माझ्यात नाही. मी तुम्हा दोघांनाही निराश केले आहे. पुन्हा परीक्षा दिली, तरी मी चांगली कामगिरी करेनच याची काही शाश्वती नाही, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.

'नीट' परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादामुळे आणि वारंवार बदलणाऱ्या निर्णयामांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र चिंता व संतापाचे वातावरण आहे.

हेही वाचा