गोव्यातील दोन्ही जिल्हा रुग्णालयात ११ जून पासून मिळणार केमोथेरपी : विश्वजीत राणे

कर्करोगग्रस्त रुग्णांना‌ मिळणार दिलासा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
30 mins ago
गोव्यातील दोन्ही जिल्हा रुग्णालयात ११ जून पासून मिळणार केमोथेरपी : विश्वजीत राणे

पणजी : राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ११ जून पासून केमोथेरपी उपचार सुरू होणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. जिल्हा स्तरावर केमोथेरपी सुविधा सुरू केल्यामुळे उपचारांची उपलब्धता वाढणार असून; त्यात सुधारणा देखील होणार आहे. नुकतीच त्यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. 

राणे यांनी सांगितले की, सध्या राज्यभरातील रुग्णांना कर्करोगाच्या उपचारांसाठी 'गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय' (गोमेकॉ) येथे प्रवास करावा लागतो. दोन्ही जिल्हा रुग्णालयात केमोथेरपीची सोय उपलब्ध झाल्यास रुग्णांना अतिरिक्त प्रवास करावा लागणार नाही. तसेच या सुविधेमुळे रुग्णांवरील ताणही  कमी होणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपी उपचार सुरू झाल्यामुळे, राज्यातील कर्करोग उपचार सेवा अधिक बळकट होण्यास मोठी मदत होईल. 

राणे यांनी सांगितले की, राज्यात कार्यरत असलेल्या सर्व स्वतंत्र रुग्णवाहिका सेवांचे लवकरच १०८ आपत्कालीन प्रतिसाद नेटवर्क'मध्ये एकत्रीकरण केले जाणार आहे. एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात किमान चार रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात केल्या जातील.  एकसंध रुग्णवाहिका प्रणाली निर्माण करणे, विविध सेवांमधील समन्वय सुधारणे, मदतीसाठी प्रतिसाद वेळ कमी करणे आणि राज्यात अधिक चांगल्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुनिश्चित करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात घेतली आढावा बैठक 

तत्पूर्वी राणे यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात आढावा बैठकीत कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले.

मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयात चार तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सेवा विस्कळीत झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर येथील सेवा सुविधांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाल्यामुळे रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालयाच्या प्रशासकांना मोठी गैरसोय झाली होती. राणे यांनी यामागे तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले. तसेच या बिघाडासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासन जबाबदार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सिटी स्कॅन यंत्र

मंत्री राणे यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय लवकरच 'सीटी स्कॅन' यंत्र आणणार असल्याचे स्पष्ट केले.  या उपकरणासाठीची ऑर्डर यापूर्वीच नोंदवण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा