वैद्यकीय पेशाला काळिमा: जिल्हाधिकाऱ्यांनी मोफत उपचाराचे आदेश देऊनही सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गरीब आईकडून उकळले पैसे. मुझफ्फरनगर येथील घटना.

मुझफ्फरनगर : वैद्यकीय पेशा हा समाजात अत्यंत पवित्र मानला जातो आणि डॉक्टरांना आजही देवाचा दर्जा दिला जातो. मात्र, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील सरकारी जिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक आणि अमानुष घटनेने या विश्वासाला तडा दिला आहे. पैशांच्या लालसेपोटी एका सरकारी डॉक्टरने चौदा वर्षांच्या मतिमंद मुलीचा जोडलेला पाय पुन्हा जाणीवपूर्वक मोडल्याचा गंभीर आरोप तिच्या असहाय्य आईने केला आहे. ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी नाही, तर व्यवस्थेतील वाढती असंवेदनशीलता आणि गरिबांच्या शोषणाचे विदारक वास्तव समोर आणणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा नावाच्या एका विधवा महिलेने आपल्या मतिमंद मुलीच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी मुझफ्फरनगर जिल्हा रुग्णालय गाठले होते. सरकारी रुग्णालयात उपचार मोफत मिळणे अपेक्षित असताना, तेथील कर्मचाऱ्यांनी या शस्त्रक्रियेसाठी तब्बल पंचवीस हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी केली. गरिबी आणि असाह्यतेमुळे रेश्मा यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली, तेव्हा त्यांना उपचारास नकार देण्यात आला. अखेर न्यायाच्या आशेने त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुलीवर तत्काळ मोफत उपचार करण्याचे स्पष्ट आदेश दिले. मात्र, प्रशासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी या गरीब महिलेकडून तरीही आठ हजार रुपये उकळले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याची सक्ती केली.
जेव्हा काही दिवसांनी तपासणीसाठी ही मायलेक पुन्हा रुग्णालयात गेली. उर्वरित पैशांची मागणी पूर्ण न झाल्याच्या रागातून शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. चतुर्वेदी यांनी तपासणीच्या बहाण्याने त्या कोवळ्या मुलीचा गुडघा अत्यंत निर्दयीपणे पिरगळला. वेदनेने किंचाळलेल्या त्या मुलीच्या पायाचे हाड पुन्हा मोडल्याचे नंतर काढलेल्या एक्स-रे अहवालात स्पष्ट झाले. हतबल झालेल्या आईने वरिष्ठ डॉक्टरांकडे न्यायाची याचना केली, मात्र कोणीही तिची दखल घेतली नाही. शेवटी या अन्यायग्रस्त आईने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. या प्रकरणावर मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील तेवतिया यांनी दोन्ही बाजू ऐकून सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.