
पणजी : बोट मालक मंजुनाथ हरीकांत यांच्या खूनप्रकरणाचा छडा लावण्यात आगशी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी नागपूर येथून दोन संशयित कामगारांना अटक केली असून; त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात खून करण्यामागच्या नेमक्या उद्देशाची माहिती घेतली जात आहे. संशयित कामगारांना ताब्यात घेतल्यानंतर या कामगारांकडून अधिक माहिती मिळवून तपासाला वेग देण्याच्या प्रयत्नात आगशी पोलीस आहेत.
दरम्यान, रविवारी वरील खूनप्रकरण उघडकीस आले होते. काही मच्छीमारांना समुद्रात मृतदेह दिसून आला होता. मृतदेह मंजुनाथ हरीकांत यांचा असल्याचे उघडकीस येताच एकच खळबळ माजली होती.
मंजुनाथ आपल्या मच्छीमारी बोटीवरील कामगारांसहीत बोट घेऊन मासेमारीसाठी गेला होता. यावेळी कामगारांनी त्यांचा खून करून मृतदेह समुद्रात टाकून नंतर बोट किनाऱ्यावर आणून पलायन केल्याचे पुढे आले आहे. मंजुनाथ यांच्याकडे असलेल्या रोख रकमेमुळे हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.