गोव्यातील सर्व रुग्णवाहिका १०८ सेवेशी जोडणार!

आरोग्यमंत्री विश्वजित राणे : दोन्ही जिल्हा इस्पितळात ११ जूनपासून केमोथेरपी सेवा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
गोव्यातील सर्व रुग्णवाहिका १०८ सेवेशी जोडणार!



म्हापसा :
राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक गतिमान करण्यासाठी गोव्यात कार्यरत असलेल्या सर्व स्वतंत्र रुग्णवाहिका आता १०८ या आपत्कालीन सेवेच्या मध्यवर्ती नेटवर्कशी जोडल्या जातील, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली.
म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात परवा घडलेल्या वीज खंडित प्रकरणाची आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गंभीर दखल घेऊन मंगळवारी इस्पितळाला भेट दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा मुंज आणि इतर वरिष्ठ डॉक्टरांसोबत एक विशेष बैठक घेतली व सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा म्हणून येत्या ११ जूनपासून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा इस्पितळांमध्ये केमोथेरपी उपचार सुविधा सुरू करण्यात येत आहे. या सुविधेमुळे कर्करोग रुग्णांना उपचारासाठी दूरवरच्या हॉस्पिटलमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. रुग्णांचा त्रास, मानसिक ताण आणि आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.
उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर देत रुग्णवाहिकेची गरज लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच रुग्णांना दर्जेदार आणि जलद तपासणी सुलभ व्हावी, यासाठी येथे नवीन सीटी स्कॅन मशीन उपलब्ध केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी, आपत्कालीन वैद्यकीय सेवेत सुसूत्रता आणण्यासाठी आणि सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या घराच्या जवळच तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी हे निर्णय आरोग्य खात्याने घेतले आहेत.
एकाच छत्राखाली ही एकात्मिक रुग्णवाहिका प्रणाली आल्यामुळे प्रशासकीय सुसूत्रता वाढेल, रुग्णांचा आपत्कालीन प्रतिसाद वेळ कमी होईल आणि आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिकांचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करता येईल. यामुळे रुग्णांना वेळेत आणि तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अधिक सुलभ होईल, अशी आशा मंत्री राणे यांनी व्यक्त केली.                     

हेही वाचा