मान्सून तीन दिवसांत गोव्यात येण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 mins ago
मान्सून तीन दिवसांत गोव्यात येण्याची शक्यता

पणजी : हवामान खात्याने गुरुवार ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाल्याचे जाहीर केले. वातावरण अनुकूल असल्यास मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत गोव्यात पोहोचण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

मान्सून केरळमध्ये १ जुन रोजी दाखल होतो. यंदा मान्सून केरळात दाखल होण्यास ३ दिवस उशीर झाला आहे. याआधी खात्याने मान्सून केरळमध्ये २६ मे रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र पोषक वातावरण नसल्याने यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. 

राज्यात ४ ते ८ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यानुसार खात्याने या पाच दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. गुरुवारी राज्यातील वातावरण ढगाळ होते. काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. राज्यात चोवीस तासात सरासरी ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

यादरम्यान मुरगावमध्ये ३३.२ तर काणकोणमध्ये १५.८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे राज्यातील तापमानात घट झाली. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे. मान्सून काळात प्रशांत महासागरात अल निनो वातावरणीय प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनचे प्रमाण सरासरीच्या ९० टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे. मागील वर्षी मान्सूनचे केरळमध्ये आगमन आठ दिवस आधीच म्हणजेच २४ मे रोजी झाले होते. यानंतर मान्सून केवळ एका दिवसात म्हणजेच २५ मे रोजी गोव्यात दाखल झाला होता.

हेही वाचा