‘धनंजय माने’ नावाचा गैरवापर करून कोट्यवधींची 'बनवाबनवी'

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने बनावट कागदपत्रांचा डाव रचला. मुंबईतील घटना.

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
49 mins ago
‘धनंजय माने’ नावाचा गैरवापर करून कोट्यवधींची 'बनवाबनवी'

मुंबई  : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पात्र 'धनंजय माने' या नावाचा गैरवापर करून मुंबईत एक सराईत भामट्याने सनदी लेखापालास (सीए) तब्बल ४ लाख २१ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गोरेगाव पूर्व भागातील एका फ्लॅटच्या विक्रीच्या बहाण्याने हा फसवणुकीचा गुंतागुंतीचा डाव रचण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधार्थ पोलीस तपास सुरू आहे.

तक्रारदार सीए यांना गोरेगाव येथील एका फ्लॅटच्या विक्रीबाबत माहिती मिळाली होती. या संधीचा फायदा घेत मुख्य संशयिताने स्वतःला फ्लॅटचा मूळ मालक 'धनंजय माने' म्हणून सादर केले. तर त्याच्या साथीदाराने 'राहुल अगरवाल' या नावाने बनावट मध्यस्थ बनून संपूर्ण व्यवहाराचे सूत्रसंचालन केले. संशयितांनी मूळ मालकाच्या कागदपत्रांवर स्वतःचा फोटो लावून बनावट ओळखपत्रे तयार केली होती. ही कागदपत्रे इतकी चतुराईने बनवण्यात आली होती की, तक्रारदार सीए यांचा त्यावर पूर्ण विश्वास बसला.

विश्वास बसल्यानंतर तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने पैसे अदा केले. प्रथम २१ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने वळवण्यात आले. त्यानंतर उर्वरित ४ लाख रुपये दादर येथे रोख स्वरूपात देण्यात आले. मात्र, रक्कम हाती पडताच तथाकथित 'धनंजय माने' याने मोबाईल बंद करून संपर्क तोडला. संशय बळावल्याने तक्रारदाराने थेट बिल्डरच्या कार्यालयात आणि मूळ मालक माने यांच्याशी संपर्क साधला असता, मूळ मालक गेल्या महिनाभरापासून मुंबईत आलेच नसल्याचे समोर आले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस तपासात एजंट राहुल अगरवालचे खरे नाव हिमांशू पांडे (वय २२) असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच फसवणुकीद्वारे मिळवलेले पैसे अमन पाल या व्यक्तीच्या बँक खात्यात वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. काळाचौकी पोलिसांनी हिमांशू पांडे, 'धनंजय माने' या नावाने वावरणारा अज्ञात आरोपी, प्रवीण आणि सिद्धार्थ या चौघांविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू असून त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या मार्गाचाही सखोल तपास पोलीस करत आहेत.


हेही वाचा