जेवणातील साखर, तेल कमी करा; व्यायाम सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

'हेल्थ विथ आयुर्वेद' उपक्रमाला आणखी एक महिना मुदतवाढ

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
38 mins ago
जेवणातील साखर, तेल कमी करा; व्यायाम सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पणजी : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) अहवालानुसार गोव्यातील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. ही आपल्या राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. हे गंभीर आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जेवणातील साखर व तेलाचे प्रमाण कमी करणे, बाहेरचे अन्न आणि सॉफ्ट ड्रिंक्स पिणे पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. आरोग्यदायी गोव्यासाठी आपण सर्वांनी आताच जागे होऊन प्रयत्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. त्यांनी एका व्हिडिओद्वारे गोमंतकीयांना हा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. यापूर्वी 'दैनिक गोवन वार्ता'ने देखील याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.



मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, गोव्यातील नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच किडनीच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात . सद्यस्थितीत गोव्यात मधुमेहाचे प्रमाण २६.२ टक्के आहे, तर याची राष्ट्रीय सरासरी ११.४ टक्के इतकीच आहे. याशिवाय, मधुमेहाच्या पूर्व टप्प्यावर (प्री-डायबिटीज) गोव्यातील २०.३ टक्के लोक आहेत, तर याची राष्ट्रीय सरासरी १५ टक्के आहे. उच्च रक्तदाबाचे गोव्यातील प्रमाण ४८.८ टक्के असून देशात हे प्रमाण ३५.५ टक्के आहे. गोव्यात लठ्ठपणाचे प्रमाण ४४.४ टक्के असून देशात ते २८ टक्के आहे. तसेच, वाढलेले पोट (सेंट्रल ओबेसिटी) असण्याचे गोव्यातील प्रमाण ५१.८ टक्के आहे, तर देशात हे प्रमाण ३.५ टक्के आहे.


NFHS-6 Flags Rising Obesity And Lifestyle Disease Burden In Goa - BW  Healthcare World


ते म्हणाले, या गंभीर समस्येवर लोकांनी आतापासूनच योग्य कृती करण्यास सुरुवात केली पाहिजे. सर्व डॉक्टरांनी या आजारांबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती करावी. विशेषतः डॉक्टरांनी मधुमेह असणाऱ्या रुग्णांना किडनीचे आजार होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी, याचे योग्य मार्गदर्शन करावे. जेवणातील साखरेचे आणि तेलाचे प्रमाण कमी केले किंवा ते पूर्णपणे बंद केले, तर ते आरोग्यासाठी उत्तम ठरेल. लहान मुलांसह सर्वांनीच बाहेरील प्रोसेस्ड फूड खाणे किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळले पाहिजे. यासोबतच नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम करणे गरजेचे आहे.


Keep burgers, pizzas & soft drinks at bay! Ultra-processed foods can up  cancer risk, says study - The Economic Times


पूर्वी किडनी डायलिसिस करणारी यंत्रे केवळ दोन्ही जिल्हा रुग्णालये आणि गोमेकॉमध्ये (जीएमसी) उपलब्ध होती. मात्र, आज राज्यातील ४० हून अधिक प्राथमिक व सामूहिक आरोग्य केंद्रांत अशी यंत्रे बसवावी लागली आहेत. एका केंद्रात चार ते पाच युनिट्स कार्यरत असली, तरीही रुग्णांना डायलिसिससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना डायलिसिस करावे लागेल अशी वेळच येऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


Dialysis: Procedure, purpose, types, side effects, and more


 'हेल्थ विथ आयुर्वेद' उपक्रमाला आणखी एक महिना मुदतवाढ

मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, यापूर्वी राज्यात ५ मे ते ५ जून दरम्यान 'हेल्थ विथ आयुर्वेद' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील २० हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा यशस्वी लाभ घेतला. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून हा उपक्रम आता ५ जून ते ५ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भविष्यात आजार होऊ नयेत म्हणून आजच काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी आपली दिनचर्या आणि ऋतुचर्या योग्य रीतीने पाळावी.

हेही वाचा