शैक्षणिक वर्ष पूर्वी सारखेच जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
48 mins ago
शैक्षणिक वर्ष पूर्वी सारखेच जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव

पणजी : गोवा मुख्याध्यापक संघटनेच्या सूचनेनंतर २०२७-२०२८ पासून शैक्षणिक वर्ष पूर्वी सारखेच जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. संबंधितांकडे बैठक झाल्यानंतर हा प्रस्ताव सरकारला सादर करणार. सरकार काय तो निर्णय घेणार; अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. 

तापमान तसेच इतर कारणांमुळे एप्र‌िलमध्ये वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती एकदम कमी असते, अशी समस्या मुख्याध्यापक संघटनेने मांडली आहे. त्यामुळे या प्रस्तावावर विचार सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) कार्यवाहीमुळे २०२५-२०२६ पासून एप्र‌िलमध्ये वर्ग घेण्याचा निर्णय झाला होता.

एनईपी प्रमाणे शैक्षणिक वर्षात ठरावीक तास वर्ग पूर्ण होणे गरजेचे आहे. जूनमध्ये वर्ग सुरू झाल्यास शैक्षणिक वर्षाच्या वेळा पत्रकाची फेरआखणी करावी लागणार, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले. 

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसाठी ब्रिज अभ्यासक्रम सुरू करण्याची आवश्यकता होती. एप्रिलमध्ये वर्गात ब्रिज अभ्यासक्रम पूर्ण होत होता. जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचारविनिमय सुरू आहे.

शैक्षणिक तास कसे पूर्ण करावे, याचा विचार करून निर्णय घेणार, असे राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले. एप्रिल पासून वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाला यापूर्वी काही पालकांनी सुद्धा विरोध केला होता. 

हेही वाचा