सेंट जोसेफ यांच्या मूर्तीची विटंबना: उत्तर प्रदेशातील संशयिताला अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 mins ago
सेंट जोसेफ यांच्या मूर्तीची विटंबना: उत्तर प्रदेशातील संशयिताला अटक

मडगाव:सां जुजे दि आरियाल येथील पंचायत घराजवळ असलेल्या सेंट जोसेफ यांच्या मूर्तीची मोडतोड केल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. राहुल सिंग चौहान (वय ३६, मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

मंगळवारी रात्री संशयिताने अतिमद्यपान केले होते आणि त्याच नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली. संशयित राहुल सिंग चौहान हा सध्या रुमडामळ येथील एका हॉटेलमध्ये कामाला आहे.

मूर्तीची विटंबना झाल्याची बातमी गावात पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत ग्रामस्थांची समजूत घातली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयिताचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या कडक चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

सां जुजे दि आरियाल भागातील सेंट जोसेफ यांच्या मूर्तीची मोडतोड होण्याची मागील काही काळातील ही तिसरी वेळ आहे. अशा घटनांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून, पोलिसांनी या प्रकरणी कठोर पावले उचलावीत आणि दोषीला कडक शिक्षा करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.


हेही वाचा