निवडणुकीची तयारी सुरू : रणनीती आखण्यास सुरुवात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी अजून काही महिन्यांचा कालावधी असला तरी सत्ताधारी भाजपने निवडणूक रणनीती आखण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडून केंद्रीय नेतृत्वाने मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाची माहितीही जाणून घेतली.
दिल्लीतील बैठकीत भाजपच्या मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीवर चर्चा झाली. पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी कार्यक्रम आणि कार्ययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला. पुढील महिन्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन किंवा राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोवा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती दामू नाईक यांनी गोव्यात परतल्यानंतर दिली.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच अन्य केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. गोव्यात परतल्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर ते पुन्हा दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली.
विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी संपत असला तरी मुदतीपूर्वी, म्हणजे डिसेंबरपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या दिल्ली दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. केंद्राकडून निधी आणि विविध विकास प्रकल्पांना मंजुरी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सातत्याने दिल्ली दौरे करत आहेत.
मंत्रिपदाबाबत निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा
सोमवारी रात्री नितीन नबीन आणि बी. एल. संतोष यांच्यासोबत झालेल्या बैठकीस राज्यसभा सदस्य सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती, मंत्री आणि आमदारांची कामगिरी तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन चर्चा केली, असेही दामू नाईक यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा रिक्त मंत्रिपद भरण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. या विषयावर बैठकीत चर्चा झाली की नाही, याबाबत भाष्य करण्यास दामू नाईक यांनी नकार दिला.
विकास प्रकल्पांना गती देण्याचे प्रयत्न
राज्यातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि नव्या प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमांना गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या दोन दिवसांत नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचे उद्घाटन होणार आहे. तसेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पर्वरी उड्डाणपुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न सुरू अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे सर्व आगामी निवडणुकीच्या रणनीतीचा भाग मानले जात आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, निवडणुका जवळ येत असताना राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. आरजी पक्षाचे नेते मनोज परब यांनी अंतर्गत वादांमुळे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पक्ष सध्या अध्यक्षांविना आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्षपदावरील नेत्यात बदल झाला असून अमित पाटकर यांच्या जागी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही नुकताच गोवा दौरा केला. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.