खासगी रुग्णालयांतील सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण : गोव्यातील प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक


02nd June, 11:34 pm
खासगी रुग्णालयांतील सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील खासगी रुग्णालयांत सिझेरियन सेक्शन पद्धतीने प्रसूती करण्याचे प्रमाण दोन वर्षांत १९.७ टक्क्यांनी वाढले आहे. याच दरम्यान सरकारी रुग्णालयांतील सिझेरियनचे प्रमाण किंचित कमी झाले आहे. सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत सिझेरियन प्रसूती करण्याचे प्रमाण तब्बल ३८.३ टक्क्यांनी अधिक आहे. गोव्यातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत सिझेरियनचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण (एनएफएचएस) ५ आणि ६ या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने २०१९-२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधारे ‘एनएफएचएस ५’ जारी केला होता. तर २०२३-२४ दरम्यान गोळा केलेल्या माहितीच्या आधारे ‘एनएफएचएस ६’ हा अहवाल नुकताच जारी केला आहे. ‘एनएफएचएस ५’ नुसार राज्यातील खासगी रुग्णालयांत सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्याचे प्रमाण ५० टक्के होते. दोन वर्षांनी म्हणजेच ‘एनएफएचएस ६’च्या माहितीनुसार यात वाढ होऊन ते ६९.७ टक्के झाले. दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील सरकारी रुग्णालयांतील सिझेरियनचे प्रमाण ३१.५ टक्क्यांवरून कमी होऊन ३१.४ टक्के झाले आहे. वरील काळात देशात सर्व रुग्णालयांत मिळून सिझेरियनचे प्रमाण २१.५ टक्क्यांवरून २७.२ टक्के झाले. ‘एनएफएचएस ६’ नुसार खासगी रुग्णालयांमधील सिझेरियनची राष्ट्रीय सरासरी ५४.१ टक्के आहे. सरकारी रुग्णालयांत हेच प्रमाण १६.९ टक्के आहे.
‘एनएफएचएस ६’ नुसार राज्यातील शहरी भागात सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्याचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे. राज्यातील शहरी भागातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत मिळून हे प्रमाण ५३.३ टक्के, तर ग्रामीण भागात ३७.७ टक्के आहे. शहरी भागातील सरकारी रुग्णालयांत हे प्रमाण ४१ टक्के, तर ग्रामीण भागात २०.२ टक्के आहे. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांत हेच प्रमाण ६९.९ टक्के, तर सरकारी रुग्णालयांत ६९.५ टक्के आहे. दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे. आधी हे प्रमाण ९९.१ टक्के होते. ते वाढून ९९.६ टक्के झाले आहे. याची राष्ट्रीय सरासरी ९१.३ टक्के आहे.
राज्यात सरकारी रुग्णालयांना पसंती
अहवालानुसार, राज्यात प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांना अधिक पसंती दिली जाते. याआधी सरकारी रुग्णालयांत प्रसूतीचे प्रमाण ५६.२ टक्के होते. दोन वर्षात ते वाढून ६०.७ टक्के झाले आहे. याची राष्ट्रीय सरासरी ५८.६ टक्के आहे. राज्यातील शहरी भागात हे प्रमाण ५७.३ टक्के, तर ग्रामीण भागात ६५.३ टक्के आहे. राज्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांत मिळून प्रसूती होण्याचे प्रमाण ९९.६ टक्के आहे.

हेही वाचा