रिसॉर्ट मालकिणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधी शिक्षा, आता निर्दोष

जलदगती न्यायालयाने ठोठावला होता १० वर्षांचा कारावास


02nd June, 11:48 pm
रिसॉर्ट मालकिणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधी शिक्षा, आता निर्दोष

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पीडित महिला आणि आरोपी एकमेकांसाठी अनोळखी होते, तरीही ओळख परेड घेण्यात आली नाही. याशिवाय आवाजावरून केलेली ओळखही अविश्वसनीय ठरली, कारण रिसॉर्टमध्ये ईशान्य भारतातील अनेक कर्मचाऱ्यांचे उच्चार सारखेच होते. तसेच सर्वांत महत्त्वाचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातील पुरावे आरोपीच्या विरोधात गेले नाहीत, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रिसॉर्टच्या मालकिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात मिझोरम येथील कर्मचाऱ्याचा १० वर्षांचा कारावास रद्द केला. तसेच संशयिताची निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. आशिष चव्हाण यांनी दिला.
या प्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रिसॉर्टच्या मालकाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदार आणि त्याची ६३ वर्षीय पत्नी तथा पीडित महिला १६ डिसेंबर २०१९ रोजी गोव्यात आले होते. त्यावेळी ते दोघे त्यांच्या रिसोर्टमध्ये राहत होते. १८ डिसेंबर २०१९ रोजी रात्री २ वाजता महिला रिसॉर्टमधील एका खोलीत झोपली होती. ती खोलीत एकटीच असल्याची संधी साधून मूळ मिझोरम येथील २२ वर्षीय रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने तिचे उशीने तोंड बंद केले होते. तिने प्रतिकार करत त्याला जखमी केले होते. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद करून १८ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली होती.
या प्रकरणी पणजी येथील जलदगती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.२६ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला आरोपी कर्मचाऱ्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी आरोपीतर्फे अॅड. साहील लवंदे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून आरोपी कर्मचाऱ्याला दिलेली १० वर्षांची तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा रद्द केली. तसेच आरोपीची निर्दोष सुटका केली.
आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद
पीडित महिला आणि आरोपी अनोळखी होते. त्यामुळे ओळखपरेडची आवश्यकता होती.
पीडितेने आवाजावरून आरोपीची ओळख केल्याचा दावा केला; मात्र रिसॉर्टमधील जास्तीत जास्त कर्मचारी मिझोरमचे होते. त्यामुळे आरोपी आणि इतर कर्मचाऱ्यांचे उच्चार सारखेच होते.
पीडितेने आरोपीला नखांनी ओरबडल्याचा दावा केला होता, मात्र तिच्या नखांच्या नमुन्यांमध्ये आरोपीच्या त्वचेचे अंश सापडले नाहीत.
वीर्याचे नमुने तपासले गेले; पण त्यांची डीएनए चाचणी आरोपीशी पडताळण्यासाठी केली गेली नाही.
बेडशीटवर सापडलेला डीएनए हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा असू शकतो.

हेही वाचा