शिक्षण संचालक शैलेश झिंगडे : शाळा, विद्यालयांचे वर्ग ६ जूनपासूनच होणार सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट कायम राहिल्यास पाऊस पडून वातावरणात गारवा निर्माण होईपर्यंत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग लवकर सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. इयत्ता बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ६ जूनपासून नियमितपणे सुरू होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर ६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. यंदा ६ जून रोजी शनिवार असल्याने वर्ग सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र वेळापत्रकानुसार शाळा ६ जूनपासूनच सुरू होतील आणि त्यात कोणताही बदल होणार नाही, असे झिंगडे यांनी ठळकपणे नमूद केले.
मान्सूनला उशीर झाल्यामुळे अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. परिणामी उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांना मे महिन्यात उन्हाळी सुट्टी दिली जात असली तरी पाऊस नसल्यामुळे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विद्यार्थी उष्ण वातावरणातही बाहेर खेळत असतात, त्यामुळे वर्गात बसण्यास त्यांना अडचण येणार नाही, असे शिक्षण विभागाचे मत आहे. तथापि, उकाड्याची तीव्रता कायम राहिल्यास शाळा लवकर सोडण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण संचालकांनी सांगितले.
६ जून रोजी शनिवार असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी सोमवारपासून शाळेत येण्यास सुरुवात करतील. स्थलांतरित कामगारांची मुले साधारणपणे दोन आठवड्यांनंतर शाळेत दाखल होतात, असेही झिंगडे म्हणाले. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, पाचवी आणि अकरावीचे वर्ग ६ जूनपासून सुरू होणार आहेत. इतर वर्ग एप्रिलपासून सुरू झाले असून उन्हाळी सुट्टीनंतर त्यांचे अध्यापन पुन्हा नियमितपणे सुरू राहील.
शिक्षकांची कमतरता नाही : शिक्षण विभाग
शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. कायमस्वरूपी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू असून ती कर्मचारी भरती आयोगामार्फत राबविली जात आहे. भरती पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध होतील. तोपर्यंत कंत्राटी शिक्षकांच्या माध्यमातून अध्यापन सुरू आहे.
शाळा इमारतीच्या आवश्यक कामांना प्राधान्य
शाळा आणि विद्यालयांच्या दुरुस्तीची कामेही शिक्षण खात्याने हाती घेतली आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केली जात आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करणे शक्य नसले तरी आवश्यक कामांना प्राधान्य दिले जात आहे. विद्यार्थी वर्गात असताना दुरुस्तीची कामे करणे शक्य नसल्यामुळे काही इमारतींची कामे उशिरा सुरू झाली आहेत. पहिल्या पावसानंतर काही शाळांच्या इमारतींमध्येही गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी नमूद केले.