गोव्यातील मद्यपान करणाऱ्या महिला, पुरुषांचे प्रमाण घटले

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण : राज्यातील सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक


03rd June, 11:45 pm
गोव्यातील मद्यपान करणाऱ्या महिला, पुरुषांचे प्रमाण घटले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्रीय आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ आणि ६ नुसार (एनएफएचएस) दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील मद्यपान करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण १४.४ टक्क्यांनी, तर महिलांचे प्रमाण ३.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. असे असले तरी राज्यातील मद्यपान करणाऱ्या महिला आणि पुरुषांचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. एनएफएचएस ६ नुसार राज्यात मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण २.१ टक्के आहे. याची राष्ट्रीय सरासरी १.१ टक्के आहे. तर राज्यातील मद्यपान करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण २२.४ टक्के आहे. याची राष्ट्रीय सरासरी १८.६ टक्के इतकी आहे.
आरोग्य खात्याने २०१९-२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधारे एनएफएचएस -५ जारी केला होता. तर २०२३- २४ च्या माहितीनुसार एनएफएचएस - ६ हा अहवाल नुकताच जारी केला आहे. एनएफएचएस -५ नुसार राज्यातील पुरुषांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण ३६.८ टक्के, तर महिलांचे प्रमाण ५.५ टक्के होते. एनएफएचएस - ६ नुसार राज्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मद्यपान करणाऱ्या महिला आणि पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागातील २४.५ टक्के पुरुष तर २.४ टक्के महिला मद्यपान करतात. ग्रामीण भागातील १९.४ टक्के पुरुष, तर १.६ टक्के महिला मद्यपान करतात.
राज्यातील पुरुष आणि महिलांमध्ये कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. एनएफएचएस ६ नुसार राज्यात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या महिलांचे प्रमाण ३.१ टक्के आहे. याची राष्ट्रीय सरासरी ८.४ टक्के आहे. तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण १७.१ टक्के आहे. याची राष्ट्रीय सरासरी ३६.३ टक्के इतकी आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण शहरी भागापेक्षा १.५ टक्क्यांनी अधिक आहे. शहरी भागात १७.१ टक्के, तर ग्रामीण भागातील १७.३ टक्के पुरुष तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
महिलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले
राज्यातील महिलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण ०.६ टक्क्यांनी वाढले आहे, तर पुरुषांचे प्रमाण १ टक्क्यांनी कमी झाले आहे. एनएफएचएस -५ नुसार राज्यातील २.६ टक्के महिला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत होत्या. ही संख्या वाढून ३.१ टक्के झाली आहे. पुरुषांचे प्रमाण १८.१ टक्क्यांवरून १७.१ टक्के झाले आहे.            

हेही वाचा