मान्सून २४ तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

७ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस शक्य


03rd June, 11:47 pm
मान्सून २४ तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अनुकूल वातावरणामुळे मान्सून पुढील २४ तासांत केरळसह तामिळनाडूच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पोषक वातावरण असल्यास मान्सून केरळनंतर गोव्यात एका आठवड्यात दाखल होऊ शकतो.
राज्यात ४ ते ते ७ जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानुसार हवामान खात्याने या चार दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ८ आणि ९ जून रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे.
पावसामुळे राज्यातील तापमानात घट झाली. पणजीत कमाल ३३.८ व किमान २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३५ अंश व किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. राज्यात चोवीस तासांत सरासरी १०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यादरम्यान काणकोणमध्ये ४३ मिमी, तर मडगावमध्ये २८.२ मिमी पावसाची नोंद झाली.
मान्सून केरळमध्ये साधारपणे १ जून रोजी दाखल होतो. याआधी हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये मुदतीपूर्वी म्हणजेच २६ मे रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र वातावरण पोषक नसल्याने मान्सूनचे केरळातील आगमन लांबले. यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मान्सूनचे केरळमध्ये आगमन आठ दिवस आधीच म्हणजेच २४ मे रोजी झाले होते. यानंतर गोव्यात २५ मे रोजी मान्सून दाखल झाला होता.             

हेही वाचा