कचरा फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल; युवकाची आत्महत्या

संबंधितांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार : पोलिसांकडून गुन्हा नोंद केल्याच्या तणावातून उचलले टोकाचे पाऊल


05th June, 11:57 pm
कचरा फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल; युवकाची आत्महत्या

सॅम्युअल ब्रागांझाच्या घरी तपास करताना पोलिसांचे फॉरेन्सिक पथक. (उमेश झर्मेकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : सोशल मीडियावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यामुळे झालेल्या बदनामीच्या मानसिक तणावातून सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा (२२, रा. गावसावाडा-म्हापसा) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वत:वर पिस्तुलाची गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गावसावाडा, म्हापसा येथे घडली. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला अटक करा, तसेच गुन्हा नोंदवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी ब्रागांझा कुटुंबियांनी केली. मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्राही त्यांनी घेतला आहे.


हा आत्महत्येचा प्रकार गुरुवारी रात्री १२.४० च्या सुमारास घडला. सॅम्युअलने बेडरूममधील बाथरूममध्ये स्वत:च्या कानशिलावर पिस्तुलाची गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्याचा आवाज येताच कुटुंबियांनी बेडरूममध्ये धाव घेतली. तेव्हा सॅम्युअल बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवला. पोलीस अधीक्षक सलीम शेख व निरीक्षक नवीन देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. ब्रागांझा कुटुंबियांनी सॅम्युअलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला अटक करा. तसेच गुन्हा दाखल केलेले पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. म्हापसा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे. सॅम्युअलने आत्महत्येसाठी देशी कट्टा पिस्तूलचा वापर केला होता. हे पिस्तूल त्याने कुठून मिळवले, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी नोंदवला गुन्हा
गावसावाडा, म्हापसा येथे रस्त्याच्या कडेला कचरा टाकतानाचा सॅम्युअलचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा प्रकार बुधवारी सायं. ६.१५ च्या सुमारास घडला होता. कचरा टाकणाऱ्या सॅम्युअलचा व्हिडिओ एका व्यक्तीने काढला होता. हा व्हिडीओ सदर व्यक्तीने गुरुवारी सकाळी व्हायरल केला. या व्हिडिओची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी सॅम्युअलविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीररीत्या रस्त्याच्या कडेला कचरा फेकून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली भा.न्या.सं.च्या कलम २७१ आणि गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल गार्बेज (कंट्रोल) कायदा १९९६च्या कलम ८(१) अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. सॅम्युअलला पोलिसांनी स्थानकात पाचारण करून कायदेशीर नोटीस दिली होती.
पालिका कामगार घेत नसल्यानेच कचरा टाकला रस्त्याकडेला
सॅम्युअल शिक्षिका असलेली आई व दोन बहिणींसोबत राहत होता. १० वर्षांपूर्वी वडिलांचे मृत्यू झाल्यानंतर या कुटुंबाला सॅम्युअलचाच आधार होता. शांत आणि मितभाषी असलेला सॅम्युअल रोज जिमला जात होता. तिथेच तो पार्ट-टाईम ट्रेनर म्हणून काम करत होता. घरात वीज दुरुस्तीचे काम निघाले होते. कामावेळी कार्डबोर्डचा कचरा जमा झाला होता. कचरा गोळा करणारे कामगार हा कचरा घेत नव्हते. त्यामुळे त्याने हा कचरा गावसावाडा येथे रस्त्याच्या कडेला टाकला. त्याचवेळी तिथून एक प्राणीमित्र व्यक्ती जात होता. त्याने व्हिडिओ काढून सॅम्युअलला जाब विचारला आणि नंतर व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे सॅम्युअलला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
चौकशीवेळी आई, बहिणीसोबत सॅम्युअल सहा तास पोलीस स्थानकात
व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सॅम्युअल मानसिकदृष्ट्या खचला होता. व्हायरल व्हिडिओच्या आधारे म्हापसा पोलिसांनी सुमारे सहा ते सात तास चौकशीच्या नावाखाली सॅम्युअलला आई आणि बहिणीसोबत पोलीस स्थानकात ताटकळत बसवून ठेवले. नंतर गुन्हा दाखल करून त्याला कायदेशीर नोटीस बजावली. पोलीस कारवाईमुळे सॅम्युअल प्रचंड मानसिक दबावाखाली गेला. याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले, असा दावा कुटुंबियांनी केला आहे.

हेही वाचा