मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश : वास्कोत २०२४ मध्ये झाला अपघात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या ७१ वर्षीय रोमालीन डिसोझा यांच्या वारसाला ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि अर्जदार यांनी भरपाईचा निर्णय घेऊन सामोपचाराने हा वाद मिटवला.
वास्को येथील जोशी चौक, नॅशनल फार्मसीजवळ २७ मार्च २०२४ रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. रोमालीन डिसोझा रस्ता ओलांडत असताना आरिफ शेख या युवकाने अॅक्टिव्हा स्कूटरने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली होती. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
मृत महिलेचे पती फ्रान्सिस आंतानियो डिसोझा यांनी १५ लाख रुपयांच्या नुकसाभरपाईसाठी दावा दाखल केला होता. मात्र, सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांनी आपापसात तडजोड करण्याचे ठरवले. विमा कंपनीने पाच लाख रुपये पूर्ण आणि अंतिम तडजोड म्हणून देण्याचे मान्य केले. मडगाव न्यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकारी शर्मिला पाटील यांनी या तडजोडीला मंजुरी दिली असून, विमा कंपनीला ही रक्कम जिल्हा सत्र न्यायालयाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.