जलस्रोत धोक्यात! नद्या, तलाव, समुद्रकिनाऱ्यांवरील प्रदूषण मर्यादेबाहेर

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल : घातक रसायनांचे प्रमाण जास्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 09:51 pm
जलस्रोत धोक्यात! नद्या, तलाव, समुद्रकिनाऱ्यांवरील प्रदूषण मर्यादेबाहेर

प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत केलेल्या तपासणीत गोव्यातील प्रमुख नद्या, तलाव आणि समुद्रकिनाऱ्यांवरील जलप्रदूषण वाढल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा पीएच आणि विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले असून, ‘फिकल कॉलिफॉर्म’ या घातक जिवाणूंची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असल्याने आरोग्य आणि पर्यावरणासमोर गंभीर धोका निर्माण झाला आहे.

१,२९९ नमुन्यांची तपासणी

प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२५-२६ या कालावधीत एकूण ११४ पाणथळ ठिकाणांहून पाण्याचे १,२९९ नमुने गोळा केले. या नमुन्यांमध्ये ३० ते ५० विविध प्रदूषण घटकांचे परीक्षण करण्यात आले. एकूण ११४ पैकी १०६ ठिकाणांवर दरमहा तपासणी करण्यात आली. यामध्ये उत्तर गोव्यातील ४९ आणि दक्षिण गोव्यातील ६५ ठिकाणांचा समावेश होता.

नद्या, तलाव, विहिरी, झरे, धबधबे तसेच १४ समुद्रकिनाऱ्यांवरील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. याशिवाय निवडक औद्योगिक वसाहतींमधील आठ ठिकाणी दर सहा महिन्यांनी भूजल तपासणीही करण्यात आली.

नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर घातक जिवाणूंचा फैलाव
  • मांडवी, साळ, वाळवंटी, जुवारी, शापोरा नद्या आणि कोलवा खाडीतील पाण्यात ‘फिकल कॉलिफॉर्म’ जिवाणूंचे प्रमाण वारंवार सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त आढळले.
  • या जिवाणूंमुळे पोटाचे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. सुरक्षित मर्यादा प्रति १०० मिलीलिटर पाण्यात १०० किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • बायणा, मिरामार, बागा, कळंगुट, मोरजी, मोबोर, गालजीबाग, कोलवा, बाणावली, बेताळभाटी, वार्का, अगोंद, पाळोळे, राजबाग, वेळसाव, वागातोर, हरमल आणि बोगमाळो किनाऱ्यांवरील पाण्यातही जिवाणूंचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त नोंदवण्यात आले.
  • हरवळे धबधब्याच्या पाण्यातही काही दिवस फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.
धोक्याची घंटा!फिकल कॉलिफॉर्मचे वाढते प्रमाण हे मलजल, सांडपाणी किंवा मानवी कचऱ्याचे पाण्यातील मिश्रण दर्शवते. अशा पाण्याच्या संपर्कातून पोटाचे आजार, त्वचारोग आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.

तलावांमधील आम्ल गुणधर्म वाढले

पाण्यातील पीएचचे प्रमाण कमी झाल्यास त्याचे आम्लीय गुणधर्म वाढतात आणि त्यामुळे जलचरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मंडळाच्या अहवालानुसार राज्यातील अनेक तलावांमध्ये पीएचचे प्रमाण बहुतांश वेळा शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा कमी होते.

बाणस्तरी, तोयार, रायतळे आणि पिळर्ण येथील तलावांच्या नमुन्यांमध्ये पीएचची पातळी कमी आढळली. तसेच काही औद्योगिक वसाहतींमधील बोअरवेलच्या पाण्यात प्राणवायूचे प्रमाण कमी, तर फिकल कॉलिफॉर्म आणि बायो-केमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) अधिक असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

भूजलात लोह आणि मँगनीजचे प्रमाण वाढले

तपासणी कालावधीत कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील १५ ठिकाणी भूजलाचे ११७ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ४५ नमुन्यांमध्ये लोहाचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळले, तर ५ नमुन्यांमध्ये निकेलचे प्रमाण जास्त होते. विशेष म्हणजे तब्बल ४८ टक्के नमुन्यांमध्ये मँगनीजची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.

ठळक निष्कर्ष
  • ११४ ठिकाणांहून १,२९९ पाण्याचे नमुने तपासण्यात आले.
  • मांडवी, जुवारी, शापोरा आणि इतर प्रमुख नद्यांमध्ये फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण वाढले.
  • १८ हून अधिक समुद्रकिनाऱ्यांवरील पाण्यात जिवाणूंची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त.
  • बाणस्तरी, तोयार, रायतळे आणि पिळर्ण तलावांमध्ये पीएचचे प्रमाण कमी.
  • कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील भूजलात लोह, निकेल आणि मँगनीजचे प्रमाण वाढले.
  • जलप्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणासमोर गंभीर आव्हान निर्माण.